क्राईमताज्या बातम्या

आर्यन खानला अडकविण्यात आले : धुळ्याचे विजय पगारे यांचे धक्कादायक खुलासे (व्हिडीओ)

आर्यन खान प्रकरण

सुनील पाटील यांनी किरण गोसावीची ओळख गुप्तहेर म्हणून करून दिली ; विजय पगारेंचा मोठा गौप्यस्फोट

आर्यन खान प्रकरणातील साक्षीदार विजय पगारे यांनी या प्रकरणामध्ये संशयित असलेला धुळ्यातील सुनील पाटील यासोबत आपण गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून होतो. आणि आर्यन खान प्रकरण डील संदर्भातील सर्व बातचीत माझ्यासमोर झाली असल्याचे म्हणत आर्यन खान हा निर्दोष असून त्याला या प्रकरणामध्ये 100% अडकवण्यात आल्याचा देखील धक्कादायक खुलासा विजय पगारे यांनी केला आहे.

धुळ्याचे सुनील पाटील यांनीच किरण गोसावीची ओळख गुप्तहेर म्हणून करुन दिल्याचं विजय पगारे यांनी सांगितलं. इतकंच नाही तर सुनील पाटील, मनिष भानुशाली आणि किरण गोसावी आदींचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा दावाही विजय पगारे यांनी केलाय.

आर्यन खान प्रकरणात मोठं रॅकेट काम करत होतं. आर्यन खान वरील कारवाई ही ठरवून केली गेली आहे. या प्रकरणात पूजा ददलानी, सॅम डिसोजा, केपी गोसावी, मनिष भानुशाली आणि मास्टर माईंड सुनील पाटील यांच्यात 100% टक्के डील झाली होती. सुनील पाटील सोबत असल्यामुळे या डीलबाबत माहिती मिळाली होती. सुनील पाटील हा हॉटेल ललितमध्ये राहत होता. किरण गोसावीच्या एका सेल्फीमुळे ही डील फिस्कटली, असा दावा विजय पगारे यांनी केलाय. (व्हिडीओ).

भाजप नेते मोहित कंबोज यांनी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाबाबत केला आहे मोठा खुलासा

भाजप नेते मोहित कंबोज यांनी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाबाबत मोठा खुलासा केला आहे. सुनील पाटील हेच आर्यन खान प्रकरणाचे मास्टर माइंड असल्याचा गौप्यस्फोट करतानाच सुनील पाटील यांचे राष्ट्रवादीशी कनेक्शन असल्याचा दावा मोहीत कंबोज यांनी केला आहे.

त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर हे सुनील पाटील नेमके कोण आहेत? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.

सुनील पाटील कोण ?

सुनील पाटील हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असून ते धुळ्याचे आहेत. गेल्या 20 वर्षापासून त्यांचा राष्ट्रवादीशी संबंध राहिला आहे. केवळ संबंधच राहिले नाही तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांचे जिगरी दोस्त आहेत. आर आर पाटील यांचे निकटवर्तीय होते. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांशी सुनील पाटील यांचे घरगुती संबंध आहेत. सुनील पाटील हे धुळ्याचे असले तरी ते मुंबईतच राहतात. गुजरात आणि दिल्लीतही त्यांचं वास्तव्य असतं. अनेक उच्चपदस्थ अधिकारी आणि राजकारण्यांशी त्यांचे संबंध आहेत. सुनील पाटील यांचा मंत्रालयात सहज वावर असल्याचं सांगितलं जात आहे. एखादं प्रकरण कसं हाताळायचं यात त्यांचा हातखंडा असल्याचं सांगितलं जातं.

आडनाव कसे पडले?

धुळ्यातील टेकडी परिसरात त्यांचे कुटुंबीय राहते. याच ठिकाणी पाटील यांचे आईवडील राहतात. पाटील यांचं धुळ्यात अधूनमधून येणं जाणं असतं. त्यांच्या पूर्वजांना पाटीलकी मिळाली. तेव्हापासून या कुटुंबाने पाटील आडनाव धारण केल्याचं सांगितलं जातं.

गणेशोत्सव दणक्यात

काही वर्षापूर्वी पाटील हे धुळ्यातील गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष झाले होते. त्यावेळी त्यांनी गणेशोत्सवावर लाखो रुपये खर्च केले होते असं सांगितलं जातं.

आरोप काय ?

मोहीत कंबोज यांनी सुनील पाटील यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. सुनील पाटीलने 1 तारखेला सॅम डिसोजाला व्हॉट्सअॅप केलं होतं. चॅट नंतर व्हॉट्सअॅप कॉल केला होता. माझ्याकडे 27 लोकांची लीड असून मुंबईत क्रुझ पार्टी होणार आहे. त्यात ड्रग्जचं सेवन होणार आहे. माझी एनसीबीच्या एखाद्या अधिकाऱ्याशी चर्चा करून द्या, असं पाटीलने सॅमला सांगितलं होतं. त्यानंतर सॅमने एनसीबीच्या व्ही.व्ही.सिंग या अधिकाऱ्याशी बोलणं करून दिलं, असा दावा कंबोज यांनी केला. तसेच सुनील पाटील बदल्यांचं रॅकेट चालवत होते. दिल्लीत बसून ते हे रॅकेट चालवत असतात. तेच पैसा घेऊन संबंधित मंत्र्यांना द्यायचे. त्यांचं राज्यभरात बदल्यांचं रॅकेट होतं. सरकार बदलल्यानंतर ते भूमिगत झाले. सरकार आल्यानंतर पुन्हा सक्रिय झाले. मोठमोठ्या हॉटेलमध्ये त्यांच्या पार्ट्या चालतात. पाटील यांचे गृहमंत्र्यांशी कनेक्शन कसे ? असा सवाल त्यांनी केला आहे.

पाहूयात काय म्हटलेत विजय पगारे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button