ताज्या बातम्या

खटाव च्या गटशिक्षणाधिकरी प्रतिभाताई भराडे मॅडम यांच्या वाढदिवसनिमित्त विशेष

ब्लॉग लेखक : स्नेहल बनसोडे शेलुडकर

आणि मुलं स्वत:च शिकायला लागली!

तुम्हांला आठवतं आपण शाळेत मुळाक्षरं कशी शिकलो ते? एक एक अक्षर पाठ होईपर्यंत आपण ते गिरवित राहायचो. आजकाल मात्र एका नवीन पद्धतीने मुळाक्षरे शिकवतात. उदा: ’म‘ हे अक्षर शिकवण्यासाठी शिक्षक प्रथम फळ्यावर एक मोठा म काढतात. त्याचा उच्चार करून याच अक्षराने चालू होणारे शब्द ते मुलांना विचारतात. अगदी लहान मुलांना सुद्धा मासा, मगर, मणी असे शब्द माहित असतात. मग हेच अक्षर बोटांनी मुलांच्या हातावर गिरवले जाते. पुढील काही दिवस मुले ते एकमेकांच्या हातावर, पाठीवर किंवा कुठेही गिरवतात. मग जमिनीवर एक मोठा ‘म’ काढून मुले त्याच्या कडेकडेने (बाह्यरेखेला धरून) मणी किंवा गोट्या ठेवतात. आता ‘म‘ हे अक्षर आणि त्याचा उच्चार त्यांच्या डोक्यात पक्के बसते.

मुळाक्षरे आणि शब्द शिकण्यासाठी मण्यांचा वापर करणारी मुले –  

या शिक्षणपद्धतीचा दृष्टिकोन असा आहे की मुलांना आधीपासून ज्ञान असते, आपले स्वतःचे अनुभव असतात. शाळेत त्यांना आपण जे नवीन शिकवतो, ते याच्याच पायावर. या सिद्धांताला ज्ञानप्रचारवाद किंवा ज्ञानरचनावाद असे म्हणतात.आज महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हा परिषद शाळांनी ही शिक्षणपद्धती अवलंबली आहे. सातारा जिल्ह्यातील कुमठे बीट मध्ये पहिल्यांदा अशा प्रकारे शिक्षण देण्यास सुरुवात झाली. “मुले जेव्हा शाळेत प्रवेश घेतात तेंव्हा त्यांचे मन म्हणजे एक कोरी पाटी असते-ही कल्पना चुकीची आहे. मुले आपल्या सभोवतालच्या परिसरातून सारखे काहीतरी शिकत असतात. त्यांची निरीक्षण क्षमता आणि ग्रहण क्षमता जबरदस्त असते. त्यांना प्रत्येक गोष्टीबद्दल कुतूहल असते, आणि मेंदूचा विकास लहानपणी सर्वात वेगाने होतो.” ज्ञानरचनावाद ही नवीन शिक्षणपद्धती प्रत्यक्षात आणून दाखवणाऱ्या कुमठे बीटच्या विस्तारअधिकारी प्रतिभा भराडे सांगत होत्या.

कुमठे बीटच्या विस्तारअधिकारी प्रतिभा भराडे

त्या हे ही म्हणाल्या की, मुलाचे अगदी बोट धरून चालण्याची, आणि त्यांना प्रत्येक गोष्ट समजावण्याची जरुरी नसते. शिक्षकाने केवळ मार्गदर्शन करावे. “जिथे अडथळा येईल तिथे मदत करायला मी असेन” हा विश्वास मुलांच्यात निर्माण करावा आणि मुलांच्या चौकस बुद्धीला प्रोत्साहन द्यावे. या शिक्षणपद्धतीमुळे मुले स्वतः विचार करायला आणि पडलेल्या प्रश्नांची उत्तरे स्वतः शोधायला शिकतात. यामुळे मुलांचा मानसिक आणि बौद्धिक विकास होतो.

जेमतेम ४० प्राथमिक शाळा असलेल्या सातारा जिल्ह्यातील कुमठे बीटने असा काही बदल घडवून आणला की देशातल्या इतर राज्यांनीही याची दाखल घेतली आहे. या बदलाचे कारण हेच की आसपासच्या परिसराला अनुसरून ज्ञानरचनावाद ही शिक्षणपद्धती इथे वापरली जाते. पाठांतर आणि घोकंपट्टीला बाद करून, समजून उमजून शिकविण्यावर इथे भर दिला जातो.

स्वतंत्रपणे विचार करण्यासाठी ज्ञानरचनावादामधून मुलांना आपोआपच प्रोत्साहन मिळते

विस्ताराधिकारी म्हणून प्रतिभा भराडे यांची २००३ साली साताऱ्याला नेमणूक झाली. सुरुवातीपासूनच पारंपरिक शिक्षणापेक्षा मुलांना जबाबदार नागरिक आणि संवेदनाशील ‘माणूस’ बनवणं त्यांना जास्त गरजेचं वाटत होतं. त्या दृष्टीने त्यांची कुमठे बीटच्या परिसरातील शिक्षकांशी सातत्याने चर्चा होत असे. मुलांना शारीरिक शिक्षा देऊ नये याबद्दल त्या आग्रही होत्या.

इथे काम करताना त्यांच्या लक्षात आलं की जरी शिक्षक आपल्यापरीने मुलांना शिक्षणाचीबद्दल गोडी लावायचा प्रयत्न करत होते तरी त्या प्रयत्नांना खास यश मिळत नव्हते. प्राथमिक शिक्षण पुरे होण्या आधीच अनेक मुले शाळा सोडून जात होती. त्यांना हे कळून चुकले की या मागचे मुख्य कारण होते, गरिबी आणि कुपोषण. शाळेतील अनेक मुलांची कुटुंबे दारिद्र्य रेषेच्या खाली होती. उपाशीपोटी शाळेत येऊन अभ्यासाकडे लक्ष देणे त्यांना जमत नव्हते. शिवाय, शाळा संपल्या संपल्या घराला हातभार लावण्यासाठी मुलं कामालाही जात होती.

हे लक्षात घेता त्यांनी ‘प्राथमिक शाळेतील मुलांना नापास करायचे नाही’ अशा प्रकारची सूचना २००४ सालीच शिक्षकांना दिली होती. म्हणजेच महाराष्ट्र शासनाने 2009 साली ‘पहिली ते आठवीपर्यंच्या विद्यार्थ्यांना नापास करू नये‘ हा आदेश आणायच्या ५ वर्ष आणि आधी कुमठे बीट मध्ये त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत होत होती.

“या परिस्थितीत दिवंगत नरेंद्र दाभोलकरांच्या पत्नी डॉ. शैला दाभोलकर आमच्या मदतीस धावून आल्या. डॉक्टर असल्यामुळे पोषक आहाराचे महत्व त्यांना माहित होते. त्याचबरोबर शैलाताईंचा सेंद्रिय शेतीचाही मोठा अभ्यास आहे. आम्ही मुलांना पोषक आहार कसा मिळेल यावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले. मुलांना शाळेत मिळणारे दुपारचे जेवण कसे पौष्टिक बनवता येईल याचा आम्ही विचार सुरु केला. जेवणासाठी लागणाऱ्या भाज्या आणि फळे, ताज्या आणि रासायनिक प्रक्रिया मुक्त असाव्यात यासाठी आम्ही शाळा – शाळांतून परसबागा बनवायला सुरुवात केली. टोमॅटो, मुळा, कोथिंबीर, गाजर, काकडी आणि पालेभाज्या शिक्षक आणि मुले मिळून पिकवू लागली,” प्रतिभा भराडे सांगत होत्या.

शाळेच्या बागेतील हिरव्यागार ताज्या भाज्या –

त्यांनी पुढे सांगितले की या उपक्रमाला ‘निसर्गातले बालवैज्ञानिक’ असे नाव देण्यात आले. “या प्रयोगामुळे मातीही कसदार झाली आणि मुलांना दररोज ताज्या भाज्या आणि फळे मिळू लागली. त्यांच्या तब्येतीवर याचा लगेच परिणाम दिसून आला. शाळेतील अनेक मुलांची कुटुंबे शेतीचा व्यवसाय करतात. त्यांनी घरीही या भाज्या आणि फळे लावायला सुरुवात केली. रोपांची हळू हळू होणारी वाढ, त्यावर येऊन बसणारे कीटक आणि पक्षी या मध्ये मुलांनां कुतूहल वाटू लागले. शिवाय बागकामाच्या या उपक्रमामुळे शिक्षक आणि मुलांमधली गट्टी वाढली. मग मुलांना अभ्यासात किंवा इतर कोणत्या अडचणी येतात, हे जाणून घेण्याचा प्रयत्न शिक्षक या अनौपचारिक गप्पांमधून करायला लागले.” भराडे सांगत होत्या. शिवाय विद्यार्थ्यांच्या आणि काही शिक्षकांच्या अडचणी ‘मानसिक समस्या’ या प्रकारात मोडणाऱ्या होत्या. अशा वेळी साताऱ्यातील डॉ. हमीद दाभोलकर यांसह अनेक मानसोपचारतज्ज्ञांनी स्वतः होऊन वेळ काढून मुलांना मदत केली असल्याचा कृतज्ञ उल्लेख प्रतिभा भराडे करतात.

स्वतःच वाढवलेल्या भाज्यांपासून बनवलेलं पौष्टिक अन्न –

या उपक्रमांसोबत, मुलांना दर्जेदार शिक्षण कसे देता येईल यावरही विचार चालू होता. २०१०-२०११ च्या दरम्यान पुण्यातील विद्या प्राधिकरण (एम एस सी इ आर टी) येथे अभ्यासक्रमाच्या पुनर्रचनेचे काम चालू होते. प्रतिभा भराडेंना तिथे भाषांचा अभ्यास करण्यासाठी निमंत्रित केले गेले. इथेच त्यांची ज्ञानरचनावादाशी ओळख झाली. ही संकल्पना अमेरिकेतील एक गणितज्ञ, संगणक शास्त्रज्ञ आणि शिक्षक सेमूर पॅपर्ट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विकसित केली, आणि शिक्षण पद्धतीत बदल घडवून आणणाऱ्या या कल्पनेने जागतिक चळवळीचे रूप धारण केले. ही अभिनव संकल्पना भरांडेंना फारच भावली. आपण ज्या प्रकारच्या अध्ययन पद्धतीच्या शोधात होतो, ती स्वतःहून आपल्यासमोर आली आहे असं त्यांना वाटलं.

भोवतालचा परिसर आणि तेथील वस्तूपासून मुले बरेच काही शिकतात-

त्यांनी या विषयाशी निगडित भरपूर वाचन सुरु केलं. यातून वारंवार एक कल्पना समोर येत होती. ती म्हणजे, मुलाला सभोवतालच्या जगाची जाणीव असते आणि त्यातून ते सारखे काहीतरी शिकत असते. जरी ही कल्पना त्यांना खूप भावली, तरी मूल स्वतःहून कुणाच्या मदतीशिवाय शिकू शकते, या बद्दल त्या साशंक होत्या. याच सुमारास त्यांनी ‘भारत विद्यालय’ या खाजगी शाळेबद्दल ऐकलं. इथे ज्ञानरचनावादाला अनुसरून शिक्षण दिलं जातं हे त्यांना समजलं. साताऱ्याजवळच्या वाईतल्या या शाळेला भेट देण्याचं त्यांनी ठरवलं.

इथल्या अभिनव शिक्षणपद्धती बद्दल जाणून घ्यायला त्या इतक्या उत्सुक होत्या की, तीन दिवस शाळेत राहून प्रत्यक्ष अनुभव घ्यायचं त्यांनी ठरवलं आणि शाळेचे संचालक अरुण किर्लोस्कर यांची परवानगीही मिळवली. “ते तीन दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय ठरले. वर्गाच्या भिंती आणि फरशा रंगविलेल्या होत्या. छडी नाही, अंगठे धरण्याची, बाकावर उभे राहण्याची अशी कुठलीच शिक्षा नाही. आणि तरीही मुलं अगदी मन लावून अभ्यास करत होती. मुलं गोलात बसली होती आणि शिक्षक खडू घेऊन फळ्याजवळ उभे न राहता, मुलांच्या बरोबर होते. काही मुलं भिंतीवर लिहीत किंवा चित्र काढत होती, तर काही मणी, चमचे घेऊन स्वतःच्या स्वतः शिकत होती. वर्गात अजिबात कुठल्याही प्रकारचा ताण तर जाणवत नव्हताच, उलट वातावरण अगदी खेळीमेळीचे आणि आनंदी होते.”

वर्गाची अनौपचारिक बैठक विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील नातेदेखील मनमोकळे करते –

भारत विद्यालयाने अवलंबलेल्या ज्ञानरचनावादावर आधारित शिक्षणपद्धतीने प्रतिभा भराडे अगदी भारावून गेल्या. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये हीच पद्धत वापरली जावी या बद्दल त्यांची खात्री पटली. २०१२ मध्ये त्यांनी कुमठे बीट मधल्या शिक्षकांसाठी ‘ज्ञानप्रचारवाद आणि मुलांची मानसिक वाढ’ या विषयावर दोन व्याखाने आयोजित केली. या व्याख्यानांद्वारे त्यांनी या सिद्धांताची शिक्षकांशी ओळख करून दिली. “मुलांना अगदी आयता घास भरवायची आणि त्यांच्या कडून घोकंपट्टी करून घ्यायची जरूरी नसते. ती स्वतःहून खूप काही शिकू शकतात. शिक्षकांनी त्यांना फक्त मार्गदर्शन करावे,” त्या म्हणाल्या. मुलाच्या आजुबाजुंच्या व्यक्तींचे वर्तन आणि मुलाच्या मेंदूचा विकास या गोष्टींचा खूप संबंध असतो हे ही त्यांनी शिक्षकांच्या निदर्शनास आणून दिले.

ज्ञानरचनावादामागील सिद्धांत समजून घेत असलेले शिक्षक-

जन्मतः सुमारे १०० अब्ज मज्जापेशी मेंदूत असतात. वयाच्या बारा वर्षांपर्यंत मेंदूची वाढ पूर्ण होते. सुखद अनुभवांनी मज्जापेशी वाढतात तर दुःखद अनुभवांनी त्या नष्ट होतात. त्यामुळे या वयात मुलांना लागेल असे बोलणे, चुकीचे वागल्यास शिक्षा करणे, यापेक्षा समजावून सांगणे, त्यांना सतत प्रोत्साहन देणे जरुरी आहे. कार्यशाळा घेऊन आणि व्याख्यानांद्वारे हे शिक्षकांपर्यंत पोचवण्यात आले.

आणि मग वेळ आली प्रत्यक्ष अंमलबजावणीची. २०१२ साली पहिलीचा वर्ग दरवर्षीप्रमाणे १४ जूनला सुरु करण्याऐवजी १ मार्चलाच घ्यायचा ठरला. शिक्षकांसोबत चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आला. मनात थोडी भीती होती, पण सुरवातीला २ महिने या पद्धतीने शिकवायचे ठरवले. जर प्रयोग फसला तर जून पासून पुन्हा जुन्या पद्धतीकडे वळायचे ठरले. शाळेचेही रूप पूर्णपणे बदलून टाकले. भिंतींना पांढरा रंग दिला. त्यावर वेगवेगळ्या रंगात बाराखडी, इंग्रजीची मुळाक्षरे, अंकगणितातल्या गमती आणि रंगीबेरंगी चित्रे रंगवली. शाळेत परसबागा होत्याच. आता, पुढील दर्शनी भागात सुद्धा फुलांची रोपे आणि झाडे लावण्यात आली.

गणिताचे सिद्धांत सहज समजण्यासाठी केलेला जमिनीचा कल्पक उपयोग-

अगदी लहान मुलांना एका जागी बसून रहायला आवडत नाही. त्यांना सतत काहीतरी नवे हवे असते. सभोवतालच्या गोष्टींबद्दल त्यांना कुतूहल असते. म्हणून आम्ही ठरवलं, की मुलांना खेळू द्यायचं, आणि खेळातूनच शिकवायचं. मग शाळेत सागरगोटे, काचाकवड्या, गोट्या, सूरपारंब्या, आबाधुबी, ठिकरी यासारखे खेळ मुलं दररोज खेळू लागली. याचा खर्च काहीच नव्हता आणि मुलांना खूप मजा येत होती. आता मुलांना शाळा आवडायला लागली. खरंतर, मुलं एकीकडे खेळत होती तर दुसरीकडे त्यांचा शारीरिक आणि बौद्धिक विकासही होत होता. या खेळांमधून लवचिकता, शरीराचा तोल सांधणं, खिलाडूवृत्ती, सांघिक बळ, हस्तनेत्रसमन्वय, तर्कबुद्धीचा वापर अशा अनेक गोष्टी घडून येत होत्या. मुलांची शाळेशी खरी ओळख होऊ लागली. आता शिक्षकांची भीती तर वाटत नव्हतीच, उलट मैत्री झाली होती.

पहिले दोन महिने पहिलीच्या शिक्षकांनी मुलांना आपलेसे करण्यात घालवले. खेळ, गप्पा, गोष्टी, गाणी याशिवाय शाळेच्या परिसरात मुलांना फिरायला नेणे – हे करता करता मुलांना शाळा आणि शिक्षक दोन्ही आवडू लागले. शाळेच्या पटांगणातील झाडे, त्यावर राहणारे पक्षी, लहान प्राणी यांच्याशी मुलांची ओळख झाली.

साधे आणि बनवण्यास सोपे असे ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य-

“मग जून महिन्यापासून हळूहळू अंक ओळख आणि अक्षर ओळख सुरु केले. खडे, चिंचोके, मणी, साधे लाकडी चमचे वापरून आम्ही त्यांना बेरीज, वजाबाकी शिकवली. शिकता शिकता मुलं खेळतही होती. त्यांना गंमत येत होती. आपला अभ्यास चालला आहे हेच मुलं विसरून गेली होती. काहीतरी जमत नाही असं एखाद्याला वाटलं तर इतर मुलं आपणहून मदत करत होती,” प्रतिभा भराडे ज्ञानरचनावाद पद्धतीने शिकवलेल्या पहिल्याच बॅच बद्दल सांगत होत्या.

शब्द चित्रांमधून भाषेची ओळख केली जाते

वेगवेगळ्या विषयांसाठी शिक्षकानीं वेगवेगळे प्रयोग केले. भाषेसाठी प्रथम मुलांना चित्रांची पुस्तकं देतात. मग त्या चित्रांविषयीच्या गप्पा होतात. मुलं या चित्रांबद्दल बोलतात. मग मुळाक्षरांशी ओळख करून देण्यात येते. नंतर त्यांना शब्द आणि चित्र असलेली वेगवेगळी कार्डे दिली जातात. मुलं त्याच्या जोड्या लावतात. याशिवाय, शब्दचक्र, शब्दांच्या भेंड्या, शब्दांचे डोंगर, एका शब्दापासून पाच वाक्यांची गोष्ट तयार करणे, बाराखडीवाचन असे अनेक उपक्रम घेतले जातात. यांच्यापेक्षा वयानी मोठी असणारी मुले गोष्टी, पत्र, लिहितात, कविता करतात आणि शब्दकोशही वापरायला शिकतात.

गणित म्हणजे मुलांचा नावडता विषय. पण गणिताशीही दोस्ती व्हावी असे अभिनव प्रयोग कुमठे बीट मध्ये सुरु आहेत. यात मणी, खडे, चिंचोके आणि स्वतःचे अवयव मोजण्याने सुरुवात होते. कधी शिक्षक सांगतील त्या नंबराची आगगाडी बनवणे, तर कधी दोन विद्यार्थ्यांनी मिळून दोन अंकी संख्या तयार करणे असे खेळ घेतले जातात. उदा: २८ हा आकडा बनवायचा असेल तर, एक मूल दशक बनतं तर दुसरं एकक. दशक झालेल्या मुलाने दोन बोटं दाखवायची, त्याचवेळी एकक झालेल्या मुलाने ८ बोटे दाखवायची. याशिवाय मुलं माळेवर मणी मोजून संख्या सांगतात, अंकांच्या गोष्टी तयार करतात, बेरजेचे उभी आडवी मांडणी करतात, खोट्या पैशांच्या आधारे व्यवहार शिकतात आणि गणिताचे इतरही अनेक रंजक खेळ खेळतात.

एकक आणि दशक पद्धती समजावण्याची ज्ञानरचनावादी पद्धत-

इंग्रजी शिकवण्यासाठी शिक्षकांनी अनेक शब्दचित्र कार्डे तयार केली आहेत. उदा: कुत्र्याचे चित्र असलेल्या कार्ड वर इंग्रजीत `डॉग’ असे लिहिले आहे. पहिल्यांदा मुलांना या शब्दाचा अर्थ समजावला जातो. अनेकवेळा चित्र बघून मुलं तो ओळ्खतातच. मग त्यांना शब्द वेगळ्या कार्डावर आणि चित्र वेगळ्या कार्डांवर असे देण्यात येते. मुलं त्याच्या जोड्या लावतात. शिवाय मुलांबरोबर साधं सोपं संभाषणही इंग्रजीतून केलं जातं. बहुतेक शिक्षकांचा हा अनुभव आहे की मुलं संभाषणातून भाषा चटकन शिकतात. माय स्कूल, माय सेल्फ, माय फ्रेंड, माय फॅमिली या विषयांवर ती सहजपणे बोलतात. शिवाय, इंटरनेटवरून इंग्रजीतून अनेक गोष्टी, बडबडगीते, कार्टून्स, डाउनलोड करून मुलांना दाखवली जातात. यामुळे मुलांचा शब्दसंग्रह खूपच वाढतो.

ज्ञानरचनावादी पद्धतीने गणित शिकणारी मुले

हे सगळं घडू लागलं आणि मग कुमठे बीटने मागे वळून पहिलेच नाही. कोणताही विद्यार्थी ‘ढ‘ नाही, कोणाविषयीही नकारात्मक बोलायचे नाही ही तत्व येथील शिक्षक कटाक्षाने पाळतात. अगदी पहिलीतल्या मुलाला सुद्धा जाण असते. आपल्या जवळच्या व्यक्तींपासून आणि परिसरातून तो बराच काही शिकलेला असतो. आणि याच पायावर त्याला पुढील शिकवण दिली जावी. मुलांना आपल्या मातृभाषेत किंवा बोली भाषेत बोलू द्यावं. अगदी शुद्ध व्याकरण असलंच पाहिजे असा आग्रह धरू नये ही सूत्रे येथे पाळली जातात. यामुळे अनेकदा असं होतं की इथली मुलं पुस्तकी बोलत नाहीत. ठोकळेबाज निबंध लिहीत नाहीत. शिक्षकांनाही माहीत नसलेले अनेक शब्द ही मुले वापरतात. स्वतःच्या शैलीत भावना व्यक्त करतात.

शिक्षक आणि मुले यांच्यातील मैत्रीपूर्ण नातेसंबंध

कुमठे बीटमध्ये हा प्रयोग यशस्वी ठरला आणि मग महाराष्ट्रातल्या अनेक शाळांनी हे मॉडेल स्वीकारले. आजवर इथल्या शाळेला हजारो शिक्षकांनी आणि अधिकाऱ्यांनी भेट येऊन या पद्धतीच्या शिक्षणाचे परिणाम बघितले आहेत आणि प्रशिक्षणही घेतलं आहे. कुमठे बीट प्रमाणे आपल्या शाळेत आपणही हे प्रयोग यशस्वी करून दाखवू हा विश्वास त्यांच्यात निर्माण झाला आहे. अशा प्रकारे ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ चे उद्दिष्ट गाठण्यासाठी कुमठे बीटने मार्ग दाखवला आहे.

ब्लॉग लेखक : स्नेहल बनसोडे शेलुडकर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button