जळगांव-क्रिप्टो करन्सीच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
शिवसेना व भडगावातील महिलांचे पोलिस अधीक्षकांना निवेदन
जळगाव जिल्हा प्रतिनिधी विनायक पाटील
जळगाव – मध्ये क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीच्या नावाने पैसे घेऊन कोणताही मोबदला व मुद्दल रक्कम परत न देणाऱ्यांविरुद्ध कारवाई करीत न्याय मिळवून देण्याची मागणी भडगाव येथील महिलांनी केली आहे.
या संदर्भात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नीलेश पाटील यांनी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांना शुक्रवारी दुपारी निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती संभाजीनगर येथील ज्ञानेश्वर योगराज देवरे, राजू कौतिकराव शेरे यांनी भडगाव येथे येऊन महिलांची बैठक घेतली. त्या वेळी त्यांनी सांगितले की, क्रिप्टो करंसीमध्ये गुंतवणूक केल्यास अल्प कालावधीत चार पट पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार महिलांनी विश्वास ठेवून प्रत्येक महिलेने आपल्यापरिस्थितीनुसार गुंतवणूक केली.काही दिवसांनी महिलांनी त्यांना पैशाबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. वारंवार पैशाची मागणी करून अखेर महिलांनी किमान मुद्दल रक्कम तरी मिळावी, अशी मागणी केली. त्या वेळी दोघांनी तुम्हाला जे करायचे ते करा, आम्ही पैसे देणार नाहीत, असे उत्तर दिले.या प्रकरणी अखेर महिलांनी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांची भेट घेत न्याय मिळवून द्यावा व संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली. निवेदनावर नीलेश पाटील यांच्यासह सीमा पाटील, भावना पाटील व इतर महिलांच्या सह्या आहेत.