जळगांव : राष्ट्रीय केळी दिवस उत्साहात साजरा, जैन इरिगेशनतर्फे विविध जनजागृती
जळगाव दि.१९ (प्रतिनिधी) – जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, जैन फार्मफ्रेश फूड्स लिमिटेड यांच्यातर्फे शहरातील भाऊंचे उद्यानाजवळ ‘राष्ट्रीय केळी दिवस’ साजरा करण्यात आला. केळीचे आरोग्यदृष्टीने असलेले अनन्य साधारण महत्त्व यावर विशेष जनजागृती करण्यात आली. यावेळी नागरिकांना ताजी पिकलेली केळी वाटप केली गेली. केळी फळातील पौष्टीक गुणधर्म या पॉकेट कार्डचे प्रकाशन प्रभारी जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांच्याहस्ते करण्यात येऊन ते नागरिकांना वाटप केले गेले. या दिनाचे औचित्य साधत काव्यरत्नावली चौकाची सजावट करण्यात आलेली असून भाऊंच्या उद्यानाशेजारी केळी बाबतचा सेल्फी पॉइंट देखील लावला गेला होता. यावेळी अनेकांनी आपले सेल्फी काढून घेऊन केळीचे आहारातील महत्त्व समजावून घेतले. अत्यंत आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा झालेला राष्ट्रीय केळी दिवस सर्वांच्या ध्यानात राहिला.केळी हे फळ इतर फळापेक्षा किती अधिकचेअन्न घटक देते हे नमूद केले आहे. केळी ही नैसर्गिक वेस्टनात म्हणजे सालच्या आतमध्ये गर असल्यामुळे अत्यंत निर्जंतुक व शुद्ध फळ आहे अशी माहिती या प्रकाशीत पॉकेट कार्डमध्ये देण्यात आलेली आहे. दरवर्षी एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी राष्ट्रीय केळी दिवस म्हणून साजरा केला जातो. सर्व प्रथम २००९ मध्ये राष्ट्रीय केळी दिवस लंडनमध्ये साजरा करण्यात आला होता. यामध्ये केळी महोत्सव उपक्रम करण्यात आला होता. तेव्हापासून सर्व जगभर राष्ट्रीय केळी दिवस साजरा केला जात आहे. जळगाव जिल्हा म्हणजे केळीचे आगार होय. ठिबक सिंचनासारख्या अत्याधुनिक सिंचन प्रणालीचा, उच्च कृषितंत्रज्ञानाचा उपयोग करून येथील शेतकरी केळीचे सर्वोच्च उत्पादन घेतात. केळीचे महत्त्व अबाल वृद्धांना समजावे यासाठी राष्ट्रीय केळी दिवस खूप उपयुक्त ठरत असतो. केळी उत्पादन करणारे शेतकरी, व्यापारी यांना चांगला आर्थिक मोबला केळीतून मिळत असतो. त्यामुळे केळीच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून केळी बागायतदारांनी केळी निर्यातीत मजल मारली आहे. जैन इरिगेशनने समाज भान ठेवून हा उपक्रम राबविणे ही देखील चांगली बाब असल्याचे प्रवीण महाजन यावेळी म्हणाले. जळगाव हे देशातील बनाना सिटी असल्याचा त्यांनी आनंद व्यक्त केला.यावेळी कार्यक्रमास प्रवीण महाजन यांच्यासह नायब तहसीलदार अमित भोईटे, विशाल सोनवणे, उप जिल्हाधिकारी राहूल पाटील तसेच डॉ. सुरेश पाटील, एम.एन. महाजन, दिनेश चौधरी, सुरेश पाटील अभियंता, पी.एम. चौधरी, अॅड महिमा मिश्रा, डॉ. सुधीर भोंगळे, राजेश वाणी, अनिल कांकरिया, शीतळ साळी, सचिन जोशी, सुदामभाई पाटील, आर. डी. महाजन, जैन इरिगेशनचे केळीतज्ज्ञ के.बी. पाटील, मोहन चौधरी, शुभम पाटील, भास्कर काळे, गौरव पाटील, किशोर रवाळे, विकास मल्हारा, अनिल जोशी यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते.