ताज्या बातम्या

धारशेरी विद्यालयात विद्यार्थ्यांनी उभारला “पुस्तकांचा दवाखाना”

धारशेरी, दि.५. (प्रतिनिधी)– माध्यमिक विद्यालय धारशेरी ता.धरणगांव येथील गुणवंत शिक्षक श्री. निलेश सोनवणे यांच्या संकल्पनेतून “आनंददायी शनिवार” या उपक्रमांतर्गत “पुस्तकांचा दवाखाना” हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला.फाटलेल्या पुस्तकांना रुग्ण मानून विद्यार्थ्यांनी चक्क पुस्तकांचा दवाखाना शाळेत भरवला होता. या उपक्रमाची मांडणी अगदी दवाखान्याच्या स्वरूपात करण्यात आली होती. ज्या प्रमाणे दवाखान्यामध्ये वेगवेगळे विभाग असतात, त्याच प्रमाणे प्रत्येक कक्षानुसार टेबल लावण्यात आली होती. जसे की नोंदणी कक्ष , रुग्ण तपासणी कक्ष, उपचार कक्ष, औषधालय कक्ष, सुट्टीचा कक्ष उभारून ज्ञान देणाऱ्या पुस्तकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. पुस्तकांना प्रत्येक टेबलवर विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या “उपचार” सेवा देण्याची जबाबदारी घेतली होती.फाटलेली पुस्तके चिकटवणे, सुटलेली पाने व्यवस्थित लावणे, कव्हर बदलणे, मुखपृष्ठ चिपकवणे अशा विविध प्रकारच्या “उपचारांद्वारे” पुस्तकांना नवजीवन देण्यात आले. विद्यार्थ्यांनी डॉक्टर आणि सहाय्यकांच्या भूमिकेत काम करत हा उपक्रम अधिक रंजक बनविला. श्री. निलेश सोनवणे यांनी पुस्तकांचे महत्त्व समजावून सांगत त्यांचे जतन कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यास तसेच जुन्या पुस्तकांबद्दल जपणूक करण्याची भावना निर्माण झाली.“पुस्तकांचा दवाखाना” हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ शैक्षणिक नसून आनंददायी अनुभव ठरला. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकांविषयी प्रेम आणि जपणुकीची भावना निर्माण झाली. .शाळेत राबविण्यात आलेल्या “पुस्तकाचा दवाखाना “या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.सदरील उपक्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री.मयुर पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांच्या सहकार्याने उत्साहाने राबविण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *