प्रा डॉ अतुल सूर्यवंशी यांना राज्यस्तरीय यशवंतरत्न पुरस्कार प्रदान
धरणगाव – येथील प रा विद्यालयाचे माजी विद्यार्थी, सध्या एम एम कॉलेज, पाचोरा येथे कार्यरत इंग्रजी विषयाचे प्रा डॉ अतुल सूर्यवंशी यांना शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या भरीव कामगिरी साठी जय मल्हार सामाजिक प्रतिष्ठान, बीड यांच्या वतीने इतिहासातील एकमेव अपराजित राजे श्रीमंत यशवंतराव होळकर यांच्या नावाने दिला जाणारा मानाचा राज्यस्तरीय यशवंतरत्न पुरस्कार बीड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच प्रदान करण्यात आला.
प्रा डॉ अतुल सूर्यवंशी हे बालभारती येथे समीक्षक म्हणून तसेच यशदा, पुणे येथे मास्टर ट्रेनर म्हणून कार्यरत आहेत. रा ति काबरे विद्यालय, एरंडोल येथील इंग्रजीचे सेवानिवृत्त शिक्षक संतोष धनगर सर यांचे ज्येष्ठ सुपुत्र आहेत. त्यांच्या या यशाबद्दल प रा विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक बी एन चौधरी, परा विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक डॉ संजीवकुमार सोनवणे, ज्येष्ठ मराठी गझलकार प्रा वा ना आंधळे, कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे प्रमुख भाऊसाहेब सुनील चौधरी, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संजय महाजन यांनी अभिनंदन केले आहे.