सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार विकास पाटील यांना राज्यस्तरीय ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार’ जाहीर

धरणगांव प्रतिनिधी / विनोद रोकडे
धरणगाव : तालुक्यातील बाभुळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार विकासराव देविदास पाटील यांना मानव सुरक्षा संस्था, मेहकर (जि. बुलढाणा) यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार-२०२६’ जाहीर करण्यात आला आहे. समाजहितासाठी निस्वार्थ भावनेने, प्रामाणिकपणे आणि सातत्याने कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यथोचित सन्मान व्हावा, या उद्देशाने हा पुरस्कार दिला जातो.
विकासराव पाटील यांनी सामाजिक व पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित, वंचित व दुर्लक्षित घटकांच्या समस्या प्रभावीपणे मांडत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. सामाजिक प्रश्नांवर निर्भीडपणे आवाज उठवणे, अन्यायाविरोधात जनमत तयार करणे, तसेच शैक्षणिक, सांस्कृतिक व विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे, ही त्यांच्या कार्याची ठळक वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या या बहुआयामी सामाजिक योगदानाची दखल घेत मानव सुरक्षा संस्थेने त्यांची ‘समाजरत्न’ पुरस्कारासाठी निवड केली आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दि.२६ जाने, २०२६ रोजी मेहकर येथील सभागृहात हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. मानव सुरक्षा संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष गजानन इंगळे, कोषाध्यक्ष संगीता साबणकर, सचिव अरुण पांडव, सहसचिव गोविंद अग्रवाल यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत विकासराव पाटील यांना हा गौरव प्रदान केला जाणार आहे. या पुरस्काराच्या घोषणेमुळे धरणगाव तालुक्यासह संपूर्ण मित्र परिवारात उत्साहाचे वातावरण असून, विकासराव पाटील यांचे सर्वच स्तरांतून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे. त्यांच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडून येत असून, हा सन्मान अनेक सामाजिक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.


