महाराष्ट्र

“सामूहिक राष्ट्रगीत गायन” कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी – अखलाख देशमुख

• स्वराज्य महोत्सव अंतर्गत अनोखा सोहळा

• 17 हजार विद्यार्थ्यांसह पालकांचा समावेश

औरंगाबाद दि. 09: ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने अनोखा कार्यक्रम राबविला. 17 हजार विद्यार्थ्यांच्या सामूहीक उपस्थितीत स्वराज्य महोत्सव अंतर्गत सामूहिक राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम विभागीय क्रीडा संकूल येथे पार पडला. जिल्ह्यातील 77 शाळा आणि महाविद्यालयातून सुमारे 17 हजार 357 विद्यार्थी आणि 5 हजार पालक सर्व विभागप्रमूख  अधिकारी, कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.

 कार्यक्रमा दरम्यान विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर विविध गीतावर नृत्य व गायन सादर केले, यामध्ये शारदामंदीर विद्यालय, एलोरा विद्यालय, वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय यांच्या चमूने राष्ट्रभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले.

 यावेळी खासदार इम्तीयाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे, ब्रिगेडियर सुनील नारायण, महानगरपालिका आयुक्त अभिजीत चौधरी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, पोलीस अधीक्षक मनीष कलावानीया, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, सर्व उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या माध्यमातून सहभागी विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेम व देशाप्रति आदर व्यक्त करण्याच्या भावनेने जो उत्सफूर्त प्रतिसाद दिला, त्याबद्दल जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतूक करत उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 केंद्र सरकारच्या अग्नीवीर या सैन्यभरतीच्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन राष्ट्रकार्यासाठी सिद्ध व्हावे. त्याचप्रमाणे देशाला मजबूत आणि विकासाकडे घेऊन जाणारी भावी पिढी राष्ट्रप्रेमाने कार्यरत राहावी. यासाठी शिक्षण, प्रशिक्षण विद्यार्थ्यांनी घ्यावे. असे आवाहन आमदार हरिभाऊ बागडे यांनी केले.

 तीन रंगाच्या कॅप घालून ज्याप्रमाणे तिरंगा स्वरुपात विद्यार्थी या राष्ट्रगीत कार्यक्रमात सहभागी झाले आहेत, त्याप्रमाणे आपला देश विविधतेतून एकतेचे प्रतिक आहे. पारतंत्र्यातून आपण जसे स्वतंत्र झालो तसे आता बेरोजगारी, गरिबी यांच्यामधून मुक्त होण्यासाठी भावी पिढीने एकत्र मिळून प्रयत्न करावेत, असे बोलून विद्यार्थ्यांना खासदार इम्तीयाज जलील यांनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *