साहेबांच्या निष्ठावंतांनी घेतली सुप्रिया सुळे यांची भेट…

धरणगाव प्रतिनिधि / विनोद रोकडे
धरणगाव – तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन “गाव तेथे राष्ट्रवादी” या संकल्पनेसाठी पोस्टर अनावरण केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नुकतेच धरणगाव शहरात मुख्यमंत्री आले असतांना साहेबांच्या निष्ठावंत शिलेदारांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवत निषेध नोंदवला. या संदर्भात तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लक्षात घेता गावागावात राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचार पोहचविण्यासाठी “गाव तेथे राष्ट्रवादी” या संकल्पनेला प्रत्यक्षात आणता यावे या उद्देशाने खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पोस्टर चे अनावरण करण्यात आले. यावेळी धरणगाव तालुका तसेच जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या संघटना बांधणीसाठी प्रयत्न करणार असल्याचा मानस सर्वच निष्ठावंतांनी बोलून दाखवला. सुप्रिया ताईंनी देखील संघटनेच्या बळकटीसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार तसेच आगामी निवडणुकांच्या निमित्ताने लवकरच जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याचे आश्वासन सुप्रिया सुळे यांनी दिले. पुढील टप्प्यात जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील बहुसंख्य कार्यकर्त्यांना घेऊन बारामती अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने पवार साहेबांच्या भेटीचा निर्धार देखील यावेळी व्यक्त करण्यात आला. या भेटीप्रसंगी माजी युवती जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सोनवद चे माजी सरपंच तथा पक्षाचे जेष्ठ पदाधिकारी बाळासाहेब पाटील, माजी सरपंच उज्वल पाटील, प्रगतीशील शेतकरी हितेंद्र पाटील, धरणगांव शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील उपस्थित होते.