आगामी निवडणुका लक्षात घेता कार्यकाळ संपलेल्या अधिकाऱ्यांची तत्काळ बदली करा – जितेंद्र महाजन
जळगाव – येत्या काही दिवसात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका यांच्या निवडणुका आहेत. जिल्ह्यासह धरणगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेले अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. सदर अधिकारी व कर्मचारी निवडणुकीवर प्रभाव टाकू शकतात.तरी त्यांची बदली करण्यात यावी अशी मागणी धरणगाव जागृत जनमंच चे प्रमुख जितेंद्र महाजन यांनी केली आहे.
आगामी येवू घातलेल्या निवडणुका निर्भय, निपक्ष आणि पारदर्शक होण्याच्या दृष्टीकोनातून जळगाव जिल्ह्यासह धरणगाव तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात याव्यात अशी मागणी जितेंद्र महाजन यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. यात प्रामुख्याने जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत, एरंडोल प्रांत अधिकारी विनय गोसावी, धरणगाव तालुक्याचे तहसीलदार नितीनकुमार देवरे, धरणगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे धरणगाव उपविभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता एम.बी.ठाकूर यांचा कार्यकाळ पूर्ण होवून देखील हे अधिकारी आज रोजी तीन वर्ष उलटून देखील कार्यरत आहेत. यांची त्वरित बदली करण्यात यावी.
सदर अधिकारी हे निवडणूक यंत्रणेवर प्रभाव टाकू शकतात. नुकत्याच नगरपालिकेच्या प्रभाग रचना जाहीर झाल्या असून यात प्रभाग रचनेवर मोठ्या प्रमाणात हरकती प्राप्त झाल्या आहेत. निवडणूक पारदर्शक होण्याकामी सदर अधिकाऱ्यांची तत्काळ बदली करण्याची मागणी जितेंद्र महाजन यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.