गुड शेपर्ड स्कुलमध्ये “आजादी का अमृत महोत्सव” उत्साहात साजरा…
धरणगाव — येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रम अंतर्गत ध्वजारोहण, प्रभातफेरी, मनोगते, सांस्कृतिक कार्यक्रम इ. विविध कार्यक्रम घेऊन स्वातंत्रदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
याबाबत सविस्तर माहीती अशी की, गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले. सर्वप्रथम शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे व शाखा व्यवस्थापक जगन गावित यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत गायन व विविध घोषणांनी शाळेचा परिसर दणाणून निघाला. तद्नंतर शाळेतून इयत्ता २ ते १० वी चे विद्यार्थी – विद्यार्थिनी व शिक्षकवर्ग प्रभातफेरीत सहभागी झाले. उड्डाणपूल – छत्रपती शिवराय स्मारकाच्या जवळ डौलाने फडकणाऱ्या राष्ट्रध्वजाला सलामी देऊन – परिहार चौक – लालबहादूर शास्त्री स्मारक – कोट बाजार – धरणी चौक (महात्मा फुले स्मारक) – पिल्लू मशिद – परिहार चौक – शिवराय स्मारक – उड्डाणपूल वरून मार्गक्रमण करत प्रभातफेरी शाळेत परतली. प्रभातफेरी च्या अग्रस्थानी विविध महापुरुषांच्या वेशभूषा साकारलेले विद्यार्थी – शिस्तबद्ध संचलन – देशभक्तीपर घोषणा यांनी धरणगावकरांचे लक्ष वेधून घेतले. शाळेत आल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर मनोगते व्यक्त केली. यासोबतच समूहगीते – वैयक्तिक गीतगायन – नृत्य – संगीत वाद्य वादन असे विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. सर्व विद्यार्थ्यांचा उत्साह अवर्णनीय होता, प्रत्येकाने आपापले अंगभूत कौशल्य दाखवून उपस्थितांची मने जिंकून घेतली.
कार्यक्रमाला शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, मुख्याध्यापिका नाजनिन शेख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारती तिवारी, अनुराधा भावे, रमिला गावित, हर्षाली पुरभे, स्वाती भावे, पूनम कासार, शिरीन खाटीक, ग्रीष्मा पाटील, नाजुका भदाणे, गायत्री सोनवणे, सपना पाटील, पुष्पलता भदाणे, अमोल सोनार, सागर गायकवाड, लक्ष्मण पाटील हे सर्व शिक्षकवर्ग तसेच इंद्रसिंग पावरा, अमोल देशमुख, सरला पाटील, शितल सोनवणे हे शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले. या देखण्या कार्यक्रमाला पालकवर्ग, नर्सरी ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी – विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे अतिशय बहारदार शैलीत व अस्खलित हिंदी मध्ये प्रास्ताविक व सूत्रसंचालन भारती तिवारी यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरम या गीताने झाला.