चाळीसगाव बसस्थानकात एस.टी. बसच्या धडकेत १३ वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

वडगाव लांबे परिसरात शोककळा, दोषींवर कठोर कारवाईची मागणी
चाळीसगाव – दि.17/01/2025 वार शनिवार रोजी दुपारी 12:30 वाजता चाळीसगाव बसस्थानकावर एस.टी.महामंडळाच्या बसखाली सापडून १३ वर्षीय विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. उपचारादरम्यान धुळे येथील रुग्णालयात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे वडगाव लांबे ता.चाळीसगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
वडगाव लांबे येथील इयत्ता आठवीत शिकणारी माधुरी शिवाजी मोरे (वय १३) हिच्या पायावरून चाळीसगाव बसस्थानकात एस.टी. महामंडळाची बस क्रमांक 2219 गेल्याने ती गंभीर जखमी झाली. अपघातानंतर चालक, कंडक्टर अथवा इतर कर्मचाऱ्यांनी तिला कोणतीही तातडीची मदत केली नाही, असा आरोप आहे. तिच्या मैत्रिणींनी पालकांना कळवण्यासाठी फोनची विनंती केली असता, त्यांनाही फोन देण्यास नकार देण्यात आला. तसेच “या मुलीसारखे तुम्हीही एकेक असेच मराल” अशा प्रकारची अपमानास्पद व धक्कादायक प्रतिक्रिया देण्यात आल्याचे सांगितले जाते.
अखेर विद्यार्थ्यांनीच आपापसात पैसे जमा करून माधुरीला चाळीसगाव येथील स्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल केले व तिच्या पालकांना घटनेची माहिती दिली. प्रकृती अधिक बिघडल्याने तिला पुढील उपचारासाठी तिला धुळे येथे हलविण्यात आले. मात्र धुळे येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर वडगाव लांबे व परिसरात हळहळ व्यक्त होत असून एस.टी. महामंडळाच्या संबंधित चालक व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.


