चोपड्यातून सात उमेदवारांची माघार ! लढतीसाठी नऊ उमेदवार रिंगणात !
प्रतिनिधी विनायक पाटील
चोपडा विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याच्या शेवटच्या तारखेला एकूण सात उमेदवारांनी आपले सर्व नामनिर्देशन पत्र माघार घेतल्यामुळे आता नऊ उमेदवार रिंगणात आहेत.
नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर आज नामनिर्देशन पत्र माघारीच्या मुदतीचा शेवटचा दिवस होता. वीहित अंतिम वेळेपर्यंत गौरव चंद्रकांत सोनवणे,डॉ बारेला चंद्रकांत जामसिंग, जगदीशचंद्र रमेश वळवी, शुभम गिरीश विसावे, रुस्तम नासिर तडवी, भूषण मधुकर भिल, साहेबराव कौतिक सैंदाणे या सहा उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतले आहेत.
नामनिर्देशन पत्र माघारीच्या मुदतीनंतर आता नऊ उमेदवार रिंगणात असून त्यांना निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार व उमेदवाराच्या पसंती क्रमानुसार चिन्ह वाटप करण्यात आले. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांना धनुष्यबाण, प्रभाकर आप्पा गोटू सोनवणे यांना मशाल, युवराज देवसिंग बारेला यांना हत्ती, सुनील तुकाराम भिल यांना हॉकी व बॉल, अमित शिराज तडवी यांना चिमणी, अमीनाबी रज्जाक तडवी यांना बॅट, बाळू साहेबराव कोळी यांना शिटी, संभाजी मंगल सोनवणे यांना कपाट तर हिरालाल सुरेश कोळी यांना ऊस शेतकरी या निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले आहे.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात, निवडणूक नायब तहसिलदार सचिन बांबळे आणि विविध अधिकारी हजर होते.