ताज्या बातम्या

चोपड्यात १९ जानेवारीपासून रोटरी उत्सव ; तयारीला वेग

चोपडा / प्रतिनिधी-विनायक पाटील

चोपडा – येथील रोटरी क्लब ऑफ चोपडाच्या वतीने गेल्या चार वर्षापासून आयोजित करण्यात येणारा रोटरी उत्सव यंदा १९ ते २२ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. जुन्या शिरपूर रोड वरील खानदेश प्रेस (विश्वनाथ जिनिंग समोर) येथे होणारा हा पाचवा रोटरी उत्सव हा केवळ रोटरी परिवाराचा नसून संपूर्ण तालुकावासियांचा आहे. तालुक्यात या उत्सवामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण होते, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष रोटे. चेतन टाटिया व प्रकल्प प्रमुख रोटे. डॉ. ईश्वर सौंदाणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
           रोटरी उत्सवाच्या तयारीला वेग आला असून खानदेश प्रेस येथे मंगळवारी सकाळी झालेल्या भूमिपूजन प्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी ते म्हणाले यंदाच्या रोटरी उत्सवाचे स्थळ बदलले असून आता अधिक मोठ्या जागेत हा उत्सव होणार आहे. या पाच एकर जागेवर राज्यभरातून अनेक व्यावसायिक आपली आपले स्टॉल या ठिकाणी लावणार आहेत. यात प्रामुख्याने ५५ बिजनेस स्टॉल, ११ प्रीमियम बिजनेस स्टॉल, फूड झोनमध्ये ५५ स्टॉल, ऑटोमोबाईल झोनमध्ये ९ स्टॉल असून बालगोपालांसाठी १ एकर जागेवर भव्य प्ले झोन असणार आहे. रोटरी उत्सवात चार दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची धमाल असून त्यासोबतच शेतकरी  व व्यावसायिक बांधवांसाठी मार्गदर्शक व्याख्याने होणार आहेत. तसेच उत्सवा दरम्यान तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना रोटरी गौरव पुरस्कार तसेच रोटरी जीवनगौरव पुरस्कार समारंभपूर्वक वितरित करण्यात येणार आहे. रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे वीस विद्यार्थिनींना सायकलींचे तसेच एका दिव्यांग व्यक्तीस तीन चाकी सायकलचे वाटप करण्यात येणार आहे. या उत्सवातून निर्माण होणारा निधी हा डायलिसिस सेंटर, वृक्षारोपण व संवर्धन, जलसंधारण, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत यासारख्या विधायक सामाजिक उपक्रमांसाठी वापरण्यात येणार आहे.
         याप्रसंगी मंचावर रोटरी उत्सवाचे सह प्रकल्प प्रमुख रोटे. विपुल छाजेड, अरुण सपकाळे, अविनाश पाटील, सचिव अर्पित अग्रवाल, कोषाध्यक्ष पवन गुजराथी हे उपस्थित होते.
           प्रारंभी प्रकल्प प्रमुख ईश्वर सौंदाणकर, विपुल छाजेड, अरुण सपकाळे यांनी उत्सवाच्या जागेचे सपत्नीक भूमिपूजन केले. याप्रसंगी रोटरीचे ज्येष्ठ सदस्य एम. डब्ल्यू. पाटील, आशिष गुजराथी, शेखर वारके, विलास पाटील, विलास पी. पाटील, नितीन अहिरराव, पुनम गुजराथी, पंकज बोरोले यांच्यासह अनेक रोटरी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपेश पाटील यांनी तर आभार प्रदर्शन मानत सचिव अर्पित अग्रवाल यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *