जळगांव – धरणगाव शहरात पाळीव डुकरांचा हैदोस ; नगरपालिका प्रशासनाची डोळेझाक
धरणगाव शहरात काही इसमांनी डुकरांची पैदास व विक्रीच्या उद्देशाने डुकरे पाळली आहेत. हि डुकरे शहरात मोकाट सोडली आहेत. या डुकरांचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या डुकरांच्या मालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात असून नगरपालिका हेतू पुरस्कर याकडे दुर्लक्ष करीत असल्याची ओरड शहरातून केली जात आहे.
धरणगाव शहरातील काही इसमांनी डुकरे पाळली असून ती शहरात मोकाट सोडली आहेत. या डुकरांचा मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सद्ध्या पावसाळ्याचे दिवस असून शहरातील विविध भागात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. अनेक ठिकाणी घाण पाण्याचे डबके साचले आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. आजाराचे प्रमाणही वाढले आहे. यातच डुकरांचा अक्षरश: हैदोस आहे. अनेकदा रस्त्यावरून जात असलेल्या वाहनाच्या अचानक मध्ये आल्याने मोठे अपघात देखील होत असतात. अनेकदा हि डुकरे हिंस्र होवून नागरिकांच्या व लहान बालकांच्या अंगावर देखील धावून येतात. शहरात राहणाऱ्या नागरिकांची या डूकरांबाबत कायमस्वरूपीची तक्रार आहे. नागरिक मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित राहत असतांना नगरपालिका नागरिकांच्या समस्यांकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप केला जात आहे.
पावसाळ्यात या डुकरांचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. विविध ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचलेले आहे. तसेच मोकळ्या जागी पडलेल्या कचऱ्यावर हि डुकरे अधिक घाण करतात. डुक्करे या कचऱ्यात लोळतात. त्यामुळे दुर्गंधी पसरते. अनेकदा हि डुकरे घरांमध्येही घुसतात. लहान मुलांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेकदा काही ठिकाणी मेलेली डुक्करे देखील आढळून येतात. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप पसरला होता.
डुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी शहरातून केली जात आहे. तसेच संबंधित मोकाट डुकरांच्या मालकांना ताकीद देण्यात यावी, अन्यथा गुन्हे दाखल करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.