जळगांव : सत्य जाणून घेण्यासाठी प्रयोग करणे आवश्यक – बरूण मित्रा
दोन दिवसीय गांधी विचार संस्कार परीक्षा परिसंवाद संपन्न
जळगाव दि.२८ प्रतिनिधी – महात्मा गांधीजींनी आपल्या आयुष्यात शेवटपर्यंत अनेक प्रयोग केले. त्यातून समजून घेणे व सत्य स्वीकारले. मुलांमधील जिज्ञासा वाढीस लागून त्यासाठी विविध प्रयोग करण्याची सवय शिक्षकांनी आपल्या कृतीतून लावली पाहिजे, असे प्रतिपादन शाश्वत विकासाचे प्रणेते बरुण मित्रा यांनी केले. गांधी विचार संस्कार परीक्षा परिसंवादाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या डॉ. गीता धर्मपाल, डॉ. अश्विन झाला, उदय महाजन व गिरीश कुळकर्णी उपस्थित होते. आपल्या मनोगतात बरूण मित्रा पुढे म्हणाले कि, देशातील तरुणाई हि संधी का? आपत्ती ठरणार हे शिक्षकांवर अवलंबून आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना हाताने काम करण्याची व श्रम प्रतिष्ठेची आवश्यकता आहे. आयुष्यभर चालणारी शिक्षणाची प्रक्रिया आनंददायी कशी होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. असे आवाहन त्यांनी केले. त्याद्वारेच देशात अपेक्षित बदल अनुभवता येईल असेही ते म्हणाले. गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे मागील १६ वर्षांपासून गांधी विचार संस्कार परीक्षा घेतली जाते. आजपर्यंत २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या प्रातिनिधिक समन्वयकांसाठी दोन दिवसीय परिसंवादाचे आयोजन गांधी तीर्थ येथे करण्यात आले होते. १६ जिल्ह्यातील ४० परीक्षा समन्वयकांनी यात सहभाग घेतला. डॉ. गीता धर्मपाल यांनी आपल्या मनोगतात भारताला विश्वगुरुपदी विराजमान करण्यासाठी महात्मा गांधीजींच्या विचारांना प्रत्यक्षात कृतीत आणण्याची आवश्यकता विविध उदाहरणाद्वारे प्रतिपादित केली. तरुणाई हि भारताची संपत्ती असून तिला योग्य दिशा देण्याचे काम शिक्षक प्रभावीपणे करु शकतात असेही त्या म्हणाल्यात. कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ. संदीप काळे, वर्षा अहिरराव, सिध्दराज भांदिर्गे, डॉ. बी. टी. शिंदे, जे. एस. महाजन, पूजा अलापुरीया आदींनी मनोगत व्यक्त केले. पाटस येथील बी. टी. शिंदे, लातूर येथील डॉ. संभाजी पाटील, सातारा येथील सिध्दराज भांदिर्गे, नंदुरबार येथील अविनाश सोनेरी, सत्रासेन चोपडाचे बी. एस. पवार व बारामती येथील शंकरराव माने यांचा विशेष गौरव चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. पहिल्या दिवशी सहभागी समन्वयकांना गांधी रिसर्च फाऊंडेशनची विस्ताराने माहिती देण्यात आली. त्यांना गांधी तीर्थ या म्युझियमसह विविध विभागांची माहितीही देण्यात आली. तसेच पीस गेमद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. गांधी विचार संस्कार परीक्षेच्या दृष्टीने येणाऱ्या अडचणींवर परिसंवादात चर्चा करण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांनी पीस वॉकचा आनंद घेतला. आगामी काळातील नियोजनावर परिसंवादात चर्चा करण्यात आली. तसेच गांधी रिसर्च फाऊंडेशनसोबत करता येणाऱ्या विविध उपक्रमांवरही चर्चा करण्यात आली. चंद्रशेखर पाटील, विश्वजित पाटील, योगेश संधानशिवे, तुषार बुंदे, सुधीर पाटील, अशोक चौधरी, सविता महाकाल, सीमा तडवी व शुभांगी बडगुजर यांनी परिसंवादाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.