जळगांव जिल्हा

धक्कादायक ! उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सर्पदंश झालेला इसम दगावला

प्रतिनिधी विनायक पाटील, चोपडा

सदर इसमाच्या मृत्यूला जबादार कोण त्यासाठी सर्वांना शोकॉज नोटीस बजावणार : डॉ.सुरेश पाटील

चोपडा – आज दिनांक 1 जुलै रोजी दुपारी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात सर्पदंश झालेला इसम डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दगवल्याची घटना घडली आहे. उपजिल्हा रुग्णालयात एका दिवसाआड होणाऱ्या प्रकाराबाबत तालुक्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे.

चोपडा येथील मोठा माळी वाड्यातील पुंडलिक गोबाळू महाजन वय 60 वर्ष हे गिरीष गुजराथी यांच्या शेतात रोजनदारीने कामाला गेले होते. दुपारचे जेवण झाल्यावर 10 मिनिटे विश्रांती घेऊ या बेताने झोपडीत बसलेले असताना अचानक सापाने त्यांच्या हाताच्या अंगठ्याला चावा घेतला आणि हाताच्या मनगटाला वेढा घेतल्याने महाजन यांनी भरपूर आरोळ्या मारल्या परंतु जवळ कोणीही नव्हते. बाजूच्या शेतातील एक इसम आला तो पर्यंत साप पसार झाला होता. तेव्हा अजून दोन ते तीन लोक आल्याने महाजन यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दुपारी 2 वाजता आणले असता ड्यूटीवर कुणीही डॉक्टर हजर नव्हते. त्यामुळे नातेवाइकांनी संताप व्यक्त करायला सुरुवात केली. तेव्हा मात्र डॉ.धनंजय आढरे तब्बल 45 मिनीटांनी हजर झाले आणि त्यांनी प्राथमिक उपचार केला. परंतु डॉ.धनंजय आढरे यांची ड्युटी दुपारी 2 वाजता संपते त्या अगोदरच ते जेवणाला बसले होते. असं त्यांनी स्वतःकबूल केले. आणि दुपारी 2 पासून डॉ.तृप्ती पाटील यांची ड्युटी होती, मात्र त्या देखिल दुपारी 3 वाजेला आल्यात. आणि तो पर्यंत डॉ.आढरे निघून गेले होते. तो पर्यंत सर्पदंश झालेले पुंडलिक महाजन यांची प्राणज्योत मावळली. म्हणून डॉक्टरांच्या हलगर्जीपणा मुळेच ते मृत झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी संताप व्यक्त करीत. मृतदेह आम्ही घरी घेऊन जाणार नाही असा पवित्रा घेतल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाचे इन्चार्ज डॉक्टर सुरेश पाटील यांनी व चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साबळे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी नातेवाईकांनी लेखीमध्ये आम्हाला द्या की, यापुढे अशी घटना होणार नाही असे सांगितले. यावेळी डॉक्टर सुरेश पाटील यांनी उद्या सकाळी मी तुम्हाला लेटर पॅड वर लिहून देतो की, यापुढे कोणतीही अशी घटना घडणार नाही याची काळजी मी स्वतः घेतो असं लेखी तुम्हाला देतो व संबंधित जबाबदार डॉक्टर असतील तर त्यांना सर्वांना शोकॉज नोटीस बजावली जाईल व त्याचा अहवाल जिल्हा अधीक्षकांकडे पाठवला जाईल असे ठणकावून सांगितले. तदनंतर नातेवाईकांनी अखेर माघार घेतली.

परंतु हा असा प्रकार वारंवार उपजिल्हा रुग्णालय येथे का होतो ? असा सवाल सामान्य नागरिकाला पडलेला आहे. कोणताही डॉक्टर वेळेवर येत नसल्याचे येथे लोकांनी बोलून दाखविले व आठ तास ड्युटी असून सुद्धा कोणीही आठ तास बसायला तयार नाही. दोन दिवसापासून विविध वृत्तपत्रांना उपजिल्हा रुग्णालयाच्या विरोधात बातम्या सुरू असून देखील निर्लज्जपणाचा कळस गाठलेला दिसतो व लोकांच्या जीवाशी हे खेळत असतात की काय ? असेही लोकांनी बोलून दाखवले. डॉक्टर सुरेश पाटील यांना इन्चार्ज असल्यामुळे ह्या सर्वबाबी ऐकावे लागल्या. संतप्त लोकांनी डॉक्टर सुरेश पाटील यांना सल्ला दिला की, समोर एक डिस्प्ले लावा त्यावेळी कोणत्या डॉक्टरांचे ड्युटी आहे व संबंधित डॉक्टरांच्या मोबाईल नंबर सुद्धा द्या. अन्यथा हे डॉक्टर इथं हजर राहत नाही. सामान्य जनतेला मोबाईल नंबर मिळाल्यास डॉक्टर कुठे आहे हे विचारायला सोईस्कर होईल आणि लोकांच्या धाकामुळे तरी डॉक्टर जागेवर बसतील असा सल्ला संतप्त नागरिकांनी यावेळी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *