धरणगांव नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी इच्छुकांचे ‘देव पाण्यात’ !

रणधुमाळी ; धरणगावात राजकीय हालचालींना वेग
धरणगाव प्रतिनिधी / विनोद रोकडे
धरणगांव – नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी इच्छुकांची चांगलीच धावपळ सुरू झाली आहे. थेट निवडणुकीत यश न मिळालेल्या अनेक हौसे-नवसे आणि राजकीय गवश्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून तरी पालिकेत प्रवेश मिळावा, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. धरणगाव नगरपालिकेत एकूण २३ नगरसेवक निवडून आले असून, यानंतर नगरपरिषदेत स्वीकृत (नामनिर्देशित) दोन नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे निवडणुकीत नाही जमले तरी, स्वीकृत सदस्य म्हणून संधी मिळावी, या उद्देशाने अनेक इच्छुकांनी आपापल्या राजकीय नेत्यांकडे मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
नगरपरिषद व नगरपंचायतीमध्ये स्वीकृत सदस्य निवडीसाठी शासनाने स्पष्ट नियमावली ठरवून दिली आहे. त्यानुसार निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्येच्या दहा टक्के किंवा पाच, यापैकी जी संख्या कमी असेल तेवढे स्वीकृत सदस्य नियुक्त केले जातात. धरणगाव नगरपालिकेतील २३ नगरसेवकांच्या संख्येनुसार येथे किमान दोन स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होणार आहे.
नव्या नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांची नावे राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर २५ दिवसांच्या आत पहिली सर्वसाधारण सभा घेणे बंधनकारक आहे. याच पहिल्या सभेत नगरपरिषद उपाध्यक्षांची निवड होणार असून, स्वीकृत नगरसेवकांची नावेही याच वेळी जाहीर केली जातील. येत्या दोन-तीन दिवसांत नवनिर्वाचित नगरसेवक व नगराध्यक्षांची नावे राजपत्रात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यानंतर २५ दिवसांच्या आत पहिली सर्वसाधारण सभा पार पडणार आहे. या सभेच्या किमान २४ तास आधी संबंधित राजकीय पक्ष, आघाडी किंवा गटाकडून स्वीकृत सदस्यांची नावे नामनिर्देशित करावी लागतात. ही नावे जिल्हाधिकाऱ्यांकडून छाननी करून पात्र उमेदवारांची यादी सभेचे पीठासीन अधिकारी अर्थात नगराध्यक्षांकडे पाठविली जाते. या प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर स्वीकृत नगरसेवक होण्याची इच्छा असणाऱ्यांनी आतापासूनच आपल्या नेत्यांकडे ‘फिल्डिंग’ लावायला सुरुवात केली आहे.
विशेषतः धरणगाव महायुती प्रणित महाराष्ट्र जन विकास आघाडी चे १५ नगरसेवक निवडून आल्याने त्यांच्या कडून इच्छुकांची संख्या मोठी असल्याने स्वीकृत नगरसेवकपदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर महाविकास आघाडी प्रणित धरणगाव शहर विकास आघाडी चे ८ नगरसेवक निवडून आल्याने एक स्वीकृत सदस्य निवडला जाणार आहे, पक्ष फुटी नंतर स्वीकृत ची माळ निष्ठावंत सैनिक सह, उपर्यांची फिल्डिंग सुरू आहे. यात कुणाच्या गळ्यात स्वीकृत ची माळ पडेल ही चर्चा शहरात जोरदार रंगत आहे.
इच्छुकांची गर्दी पाहता अनेकांचा भ्रमनिरास होण्याची शक्यता असून, तरीही शेवटपर्यंत प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धार अनेकांनी केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे स्वीकृत सदस्य निवडीत राजकीय धक्का-तंत्राचा वापर होण्याचीही चर्चा शहरात रंगू लागली आहे.


