धरणगांव येथील लक्ष्मणरावांनी सामाजिक जाणीवेतून केला वाढदिवस साजरा !

धुळे – तालुक्यातील नगाव येथील नवजीवन विद्या विकास मंडळ संचलित दिव्यांग युनिट, वृद्धाश्रम व व्यसनमुक्ती केंद्रात लक्ष्मणराव पाटील मित्र परिवाराच्या वतीने चिमुकली मुलं, आजी – आजोबा यांच्यासोबत वाढदिवस साजरा करत तसेच दुपारचे स्नेहभोजन घेऊन आनंदोत्सव साजरा केला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, धुळे तालुक्यातील नगाव येथील नवजीवन विद्या विकास मंडळ संचलित दिव्यांग युनिट, वृद्धाश्रम व व्यसनमुक्ती केंद्र येथे दिव्यांग – अस्थिव्यंग, वृद्ध आजी – आजोबा यांची प्रेमाने काळजी घेतली जाते तसेच विविध व्यसनाधीन लोकांवर आपुलकीने उपचार करून जीवनाचा मार्ग दाखवला जातो. माणुसकीचा जिवंत झरा असलेल्या नवजीवन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत भदाणे वयाच्या 67 व्या वर्षी सुद्धा तेवढ्याच तळमळीने या सर्व अडलेल्या नडलेल्यांची सेवा करतात. या सर्व मंडळींसोबत वाढदिवस साजरा करण्याचा मानस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धरणगाव शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांच्या मित्र परिवाराने बोलून दाखवला. त्यानुसार काल 20 सप्टेंबर रोजी सर्वज्ञ इंडस्ट्रीज व धनश्री इन्फ्रा यांच्या संयुक्त विद्यमाने नवजीवन मंडळाच्या या सर्व मंडळींसोबत दुपारचे जेवण करून वाढदिवस साजरा करण्याचे निश्चित झाले. कार्यक्रमाच्या सुरवातीला सरस्वती मातेचे प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून मंगलमय वातावरणात कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यानंतर धरणगाव च्या सर्व मंडळींचा संस्थेचे अध्यक्ष शशिकांत भदाणे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. संस्थेच्या प्रथेनुसार सर्व वयोवृद्ध आजी – संस्थेच्या महिला कर्मचारी – निरागस चिमुकल्या मुलींनी लक्ष्मणराव पाटील यांचे औक्षण करत आशीर्वाद दिलेत.
सत्काराला उत्तर देतांना लक्ष्मणराव म्हणाले की; उच्चशिक्षित मुलांचे आई वडील वृद्धाश्रमात आहेत, सर्वांग सुंदर लेकरांना नैसर्गिक कमतरता आहेत आणि व्यसनापासून लांब जाण्याच्या आशेने काही मंडळी इथे उपचार घेत आहेत. मी अनेकदा विचार करतो की मला हे मिळालं नाही ते मिळालं नाही परंतु आज माझा सर्व अहंकार गळून पडला जेव्हा मी या सर्वांना बघितलं, अशी भावना श्री. पाटील यांनी व्यक्त केली. संस्थेचे अध्यक्ष शशिकांत भदाणे यांनी सांगितले की, 1983 साली झालेल्या एका जबर अपघातातून बचावलो आणि नवजीवन मंडळाचा जन्म झाला, या सर्व प्रवासात शरदचंद्रजी पवार साहेबांनी वेळोवेळी मदत केली. गेल्या 35 वर्षांपासून हा सर्व गोतावळा सांभाळत असतांना अनेकदा अडचणी आल्यात परंतु सकारात्मक ऊर्जा व प्रामाणिकपणे काम करत राहिलो म्हणून मदतीचे हजारो हात नेहमीच पुढे सरसावले. आमच्या संस्थेत आजी – आजोबांना नातवंडांचं प्रेम व नातवंडांना आजी – आजोबांची माया लाभते. अनेक लोकांना व्यसनापासून दूर करून बरेच संसार सुखाचे झाल्याचं समाधान मिळतं अशी भावना, श्री. भदाणे यांनी व्यक्त केली. कार्यक्रम संपल्यानंतर आयोजकांनी बहुजन महापुरुष व महामाता यांच्या संदर्भातील ग्रंथाचे वाटप केले. त्यानंतर सर्वांनी वरण – भात, चपाती, दोन भाज्या व गोड पदार्थाने युक्त स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला. या अतिशय गोड कार्यक्रम प्रसंगी धरणगाव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, जेष्ठ पदाधिकारी राजेंद्र धनगर, नंदू धनगर, भगवान शिंदे, सर्वज्ञ इंडस्ट्रीजचे एकनाथ पाटील, धनश्री इन्फ्राचे मोहीत पवार, जुनेद बागवान, प्रफुल पवार, कु धनश्री आदी लक्ष्मणराव मित्र परिवाराचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा कुलकर्णी सरांनी तर आभार प्रदर्शन विश्वप्रताप यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवजीवन विद्या विकास मंडळ संचलित दिव्यांग युनिट, वृद्धाश्रम व व्यसनमुक्ती केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी वृंदानी परिश्रम घेतले. कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर सर्व निरागस चिमुकले, आज्जी – आजोबा तसेच कर्मचारी संस्थेचे अध्यक्ष व कर्मचारी वर्ग यांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान स्पष्ट दिसत होते.