ताज्या बातम्या

धरणगावात परंपरागत उत्सवाची जागा धोक्यात ? नागरिकांचा संताप आणि मुख्याधिकारी यांना निवेदन..

▪️परंपरा जपण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची चेतावणी

धरणगाव प्रतिनिधी / विनोद रोकडे

धरणगाव : शहरातील सर्वांचे ग्रामदैवत आईमरी देवी मंदिरासमोरील परंपरागत पवित्र जागेवर नगरपालिकेच्यावतीने सुरू करीत असलेल्या बांधकामामुळे समस्त धरणगाव शहर व परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सदरील नियोजित जागेवर होत असलेल्या पाण्याची टाकी (जल कुंभ), आणि उद्यान (बगीचा) होऊ नये, यासंदर्भात धरणगाव नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी मा. रामनिवास झंवर यांना समस्त माळी समाज, पाटील समाज, तेली समाज, मराठे समाज, जागृती युवक मंडळ, रावण दहन समिती, पंच मंडळ, आणि शहरातील सुज्ञ नागरिकांनी निवेदन सादर केले.
आईमरी मंदिर समोरील, व छ.शिवाजी महाराज तलाव तलावाच्या पूर्वेस असलेल्या जागेवर शासनाच्या माध्यमातून होत असलेल्या पाण्याची टाकी, व उद्यान तयार करीत असल्याचा आराखडा आहे. परंतु शेकडो वर्षांची परंपरागत मरीआई संस्थांच्या वतीने दरवर्षी श्रावण महिन्यात एक महिनाभर यात्रा भरते. तसेच, शेकडो वर्षांपासून सुरू असलेली रावण दहनाची परंपरा येथे टिकून असल्याने संपूर्ण गावातील लोकं मिळून ह्याच जागेवर रावण दहन केले जाते. सदरील रावण दहन व यात्रेच्या जागेवर यात्राप्रसंगी पूजेची दुकाने, खेळणी, संसारोपयोगी साहित्य, लहान-मोठी दुकाने लावली जातात, यांसह पाळणा घर केले जाते. त्याचप्रमाणे इतर दुकानदार, व्यावसायिक यांना उदर-निर्वाहसाठी देखील आईमरी यात्रेची शोभा वाढवितात. म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून गावकऱ्यांचे धार्मिक पूजाअर्चा, सांस्कृतिक कार्यक्रम, यात्रोत्सव आणि पारंपरिक उत्सव पार पडत आले आहेत. मात्र, शासनाच्या माध्यमातून नगरपालिकेच्या या पावलामुळे शेकडो वर्षांची परंपरा धोक्यात येईल अश्या भीतीपोटी सदरील कामाला आमचा संपूर्ण समाजाचा विरोध आणि हरकत आहे. तरी शासन प्रशासनाने आम्ही दिलेल्या निवेदनाची दखल घेत सहकार्य करावे.

▪️सामाजिक ऐक्याचे प्रतीक असलेली जागा..

या ठिकाणी दरवर्षी समस्त माळी समाज, पाटील समाज, तेली समाज, मराठे समाज, जागृती युवक मंडळ, आई मरी संस्थान अध्यक्ष व पंच मंडळ तसेच विविध सामाजिक संस्था उत्सव साजरे करतात. ही जागा केवळ धार्मिक नसून सामाजिक एकतेचे व बंधुभावाचे प्रतीक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

▪️उद्घाटन/भूमिपूजन तातडीने थांबवा, अन्यथा आंदोलन

नागरिकांनी निवेदनात म्हटले आहे की, “ही जागा जनतेची असून येथे कोणतेही शासकीय बांधकाम आम्हाला मान्य नाही. बांधकाम सुरू राहिल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल.” प्रशासनाने सदरील जागा मूळ स्वरूपात कायम ठेवावी, अशी सर्व समाजांची एकमुखी मागणी आहे.
निवेदन सादर प्रसंगी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कडू महाजन, माजी उपनगराध्यक्ष दिपक वाघमारे, चुडामण पाटील, राजेंद्र चौधरी, किशोर महाजन, भीमराज पाटील, राजेंद्र वाघ, आनंद पाटील, गोरख महाजन, गोपाल पाटील, गोरख देशमुख, मधुकर पाटील, प्रवीण महाजन, विजय पाटील, हेमू चौधरी, महिपत चौधरी, जीतू महाराज, कोमल पहेलवान, भैय्या मराठे आदींसह असंख्य नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *