धरणगाव आयटीआयमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाधारित स्वयंरोजगार अभ्यासक्रमांना सुरुवात..

धरणगाव प्रतिनिधी – विनोद रोकडे
धरणगाव : आजच्या युगात तंत्रज्ञानातील झपाट्याने होणारे बदल व रोजगाराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन युवक-युवतींना कौशल्याधारित शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर धरणगाव येथील क्रांतिकारी खाजाजी नाईक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) तर्फे कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या माध्यमातून अल्पमुदतीचे आधुनिक व्यवसाय अभ्यासक्रम नुकतेच सुरू करण्यात आले आहेत. या अभ्यासक्रमांचा प्रमुख उद्देश ग्रामीण व शहरी भागातील युवक-युवतींना तंत्रज्ञानाशी सुसंगत प्रशिक्षण देऊन, त्यांना रोजगारक्षम तसेच स्वयंरोजगारक्षम बनविणे हा आहे.
प्रवेशासाठी पात्रता -किमान शैक्षणिक पात्रता : इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे विद्यमान शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच व्यवसायिकांनाही प्रवेशाची संधी मिळत आहे. शासनामार्फत पहिल्या बॅचसाठी केवळ १०० रुपये प्रवेश शुल्क आकारले आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर NSQF प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
सुरू झालेले अभ्यासक्रम – १) किसान ड्रोन ऑपरेटर, २) आर्टिफिशियल इंटेलिजन्स, असिस्टंट, ३) सोलर पंप टेक्निशियन, ४) फिटर फॅब्रिकेशन, ५) असिस्टंट ब्युटी थेरपिस्ट, (महिलांसाठी), ६) एलईडी लाईट रिपेअर, ७) ॲडवान्स कम्युनिकेटीव्ह इंग्लिश व प्रोफेशनल स्किल ट्रेनर आदी अभ्यासक्रमद्वारे युवकांसाठी संधी उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून, ड्रोन ऑपरेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सोलर एनर्जी, कम्युनिकेशन स्किल्स यांसारख्या क्षेत्रांत करिअर घडविण्याची नवी दारे उघडली जात आहेत. प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुकांनी तात्काळ धरणगाव शासकीय आयटीआय येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी नवनीत चव्हाण तसेच प्र. प्राचार्य एम. ए. मराठे यांनी केले आहे.