धरणगाव तालुक्याचे औदार्य; गुलाबराव देवकरांना चमगाव-अहिरे गावातून ७७ हजाराची मदत…!
प्रतिनिधि – विनोद रोकडे / अजय बाविस्कर
जळगाव : विधानसभेच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूतीचे वातावरण तयार झाले आहे. प्रचार रॅलीदरम्यान विशेषतः धरणगाव तालुक्याने तर मोठे औदार्य दाखवत त्यांच्यासाठी लोकवर्गणी जमा करण्याचा नवा पायंडा यंदाच्या निवडणुकीत पाडला आहे. ज्याची सध्या सगळीकडे चर्चा देखील आहे.
जळगाव ग्रामीण मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना गावागावातील मतदारांकडून तन, मन आणि धनाने पाठिंबा मिळू लागला आहे. धनशक्ती विरूद्ध जनशक्तीच्या या लढ्यात धरणगाव तालुक्यातील बिलखेडा गावाने सुमारे ५० हजार रूपये लोकवर्गणी जमा करून त्याची सुरूवात केली. त्यानंतर धरणगाव तालुक्यातील चमगाव आणि अहिरे या गावांनी ‘हम भी किसी से कम’ नसल्याचे दाखवून दिले आहे. चमगावने ५१ हजार रूपये तसेच अहिरे गावाने २६ हजार रूपयांची लोकवर्गणी सोपविल्यानंतर भारावलेले माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आपल्यासाठी ही मदत लाख मोलाची असल्याची भावना व्यक्त केली.
शेतकरी व शेतमजुरांनी पै-पै जमा करून सोपवलेली मदत स्वीकारताना स्वतः गुलाबराव देवकर आणि त्यांच्या सोबतच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले. धनशक्ती विरूद्ध जनशक्तीच्या या लढाईत चमगाव आणि अहिरे येथील ग्रामस्थांकडून मिळालेल्या या आर्थिक मदतीने माझा विजयाचा आत्मविश्वास आणखी वृद्धींगत झाला आहे. समोर कोणतीही मोठी शक्ती आली तरी तिला मी घाबरणार नाही. उलट माझ्यात दहा हत्तींचे बळ संचारले आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री देवकर यांनी दिली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तसेच शिवसेना ठाकरे गट व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.