धरणगाव येथे श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह भक्तिभावात संपन्न

धरणगाव प्रतिनिधी / विनोद रोकडे
धरणगाव येथे श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि. 14 डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीत अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह अत्यंत भक्तिभाव, श्रद्धा व उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन समस्त तेली समाज व पंच मंडळ तसेच तेली युवक मित्र मंडळ, तेलाठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
सप्ताहाच्या प्रारंभी भव्य कलश मिरवणूक काढण्यात येऊन अखंड हरिनाम कीर्तनास प्रारंभ करण्यात आला. या सप्ताहात नामवंत कीर्तनकार ह.भ.प. पंकज महाराज एकतासकर, ह.भ.प. लक्ष्मण महाराज तांदळवाडीकर आणि ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी कीर्तन सेवा सादर केली. त्यांच्या कीर्तनातून संताजी महाराजांचे विचार, वारकरी संप्रदायाची परंपरा, सामाजिक समता, भक्ती व सदाचाराचे महत्व प्रभावीपणे मांडण्यात आले.
दि. 17 डिसेंबर रोजी सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी काल्याच्या कीर्तनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हे काल्याचे कीर्तन ह.भ.प. शांताराम महाराज शेंदुर्णीकर यांनी सादर केले. त्यांच्या ओजस्वी व भावपूर्ण कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. काल्याच्या कीर्तनातून भक्तीचा आनंद, एकात्मता व संत परंपरेचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.
सप्ताहात दररोज पहाटे काकड आरती, सकाळी हरिपाठ, व रात्री कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. धरणगाव परिसरासह तालुका व जिल्ह्यातील मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून हरिनामाचा लाभ घेतला.
सप्ताहाच्या समारोपप्रसंगी संताजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त महाआरती, पालखी सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला.
या अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक मंडळ, समस्त तेली समाज व पंच मंडळ, तेली युवक मित्र मंडळ, महिला मंडळ तसेच सर्व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. अखेरीस आयोजकांनी सर्व कीर्तनकार, भाविक, देणगीदार व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.


