निरोगी आरोग्य हीच सुदृढ जीवनाची गुरुकिल्ली : डॉ शिल्पा साळुंखे बोरसे
चोपडा प्रतिनिधी विनायक पाटील
महिला दिन विशेष महिला व मुलींना मार्गदर्शन संपन्न….
मुलींमध्ये आरोग्यविषयक जे बदल होतात, ते महिला पालक यांनी विशेषतः समजून घेणे आवश्यक आहे. तसेच आईने आपल्या मुलींची मैत्रीण म्हणून भूमिका पार पाडावी. जेणेकरून मुली सर्व समस्या आईं जवळ सहजतेने बोलतील व त्यातून मुलींच्या समस्या सोडवल्या जातील. यासोबत मुलींना सकस आहार द्यावा, मोबाईल पासून शालेय विद्यार्थ्यांना दूर ठेवावे. यातच निरोगी आरोग्य सामावले आहे. आणि निरोगी आरोग्य हीच सुदृढ जीवनाची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन गोरगावले येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.शिल्पा साळुंखे बोरसे यांनी विद्यार्थिनींना समायोजित करताना केले. त्या चोपडा येथील महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयात महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर प्रमुख वक्त्या शिक्षण शास्त्र महाविद्यालयातील सहाय्यक प्रा. डॉ. सविता जाधव या होत्या. तर माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक निळकंठ सोनवणे व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भूपेश सोनवणे हे उपस्थित होते. तर प्रा. डॉ. सविता जाधव यांनी विशेषतः मोठ्या प्रमाणात उपस्थित महिला पालकांशी संवाद साधला. आपल्या मुलांवर परीक्षेचा ताण येणार नाही यासाठी पालकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. याची जाणीव करून दिली परीक्षेचा विद्यार्थ्यांच्या मनावर ताण येणार नाही यासाठी सहजतेने परीक्षेला सामोरे जावे व स्वीकार करावा असे सांगितले. आणि विद्यार्थिनींशी बोलताना प्रत्येकाने स्वतःला ओळखावे. महिला आणि विद्यार्थी यांना उपदेश करताना सांगितले की, आपल्या मधील स्व ची जाणीव होणे हे जीवन कौशल्य खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने आपल्या अंतरंगात झोकून डोकावून स्व ला ओळखले पाहिजे. निश्चितच जीवनात यशस्वी होता येईल. यावेळी महिला पालकांनी उत्तम प्रतिसाद या दोन्ही वक्त्यांना दिला.कार्यक्रमात बालवाडी विभाग, प्राथमिक विभाग व माध्यमिक विभागातील रंगोत्सव या चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांना सोनेरी पदक, रौप्य पदक आणि कांस्य पदक प्राप्त झालेले होते. त्या मेडल व प्रमाणपत्राचे वितरण प्रमुख वक्ते डॉ शिल्पा साळुंखेबोरसे आणि प्रा डॉ. सविता जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री एन एस सोनवणे यांनी केले तर सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षिका सुरेखा कोळी यांनी तर बालवाडी विभागाच्या सुमती पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालवाडी विभाग प्राथमिक विभाग आणि माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.