ताज्या बातम्या

पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करा अन्यथा आत्मदहन करणार : मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हा सरचिटणीस राम तरटे यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

नांदेड प्रतिनिधी / दीपक मठपती

नांदेड – राज्यात पत्रकार संरक्षण कायदा येत्या २६ नोव्हेंबर पूर्वी म्हणजेच संविधान दिनाच्या पूर्वी लागू करावा अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या कक्षासमोर आत्मदहन करू असा इशारा नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हा सरचिटणीस राम तरटे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना दिला आहे. आपल्या मागणीचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांसह राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांनाही पाठविले आहे.

राज्यात पत्रकारांवर होणारे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. पत्रकारांना कायद्याने संरक्षण मिळावे यासाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त , महाराष्ट्राच्या तमाम पत्रकारांचे पाठीराखे एस .एम. देशमुख यांनी तब्बल 40 वर्षे संघर्ष करून पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करून घेतला परंतु या कायद्याची राज्य सरकारने सन 2019 पासून अद्यापही अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे राज्यातील मुजोर राजकारणी , माफिया , गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून पत्रकारांवर वारंवार हल्ले होत आहेत. पत्रकारांचे खून केले जात आहेत. परिणामी पत्रकार भयभीत झाला असून देशाची लोकशाहीच धोक्यात आली आहे. अशा परिस्थितीत देशाच्या लोकशाहीला वाचवण्यासाठी आणि पत्रकारांना कायद्याने संरक्षण मिळावे यासाठी एस.एम. देशमुख यांनी मंजूर करून घेतलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याची येत्या 26 नोव्हेंबर पूर्वी म्हणजे संविधान दिनाच्या पूर्वी राज्य सरकारने अंमलबजावणी करावी अन्यथा मुख्यमंत्रीच्या दालनासमोर मुंबईत 26 नोव्हेंबर रोजी आत्मदहन करण्यात येईल असा इशाराही राम तरटे यांनी दिला आहे . त्यानंतर माझ्या जीवितास काही झाले तर त्यास केवळ राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार असतील असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. आपल्या मागणीचे निवेदन त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *