बालकवी ठोंबरे शाळेत माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न
शाळेतील गुरुदक्षिणा हॉलसाठी विद्यार्थ्यांनी दिली देणगी
धरणगाव प्रतिनिधी / विनोद रोकडे
गुरू हा कुंभारासारखा असतो, जो कच्च्या मातीचा योग्य वापर करून आकर्षक भांडे बनवतो. एक चांगला शिक्षक आपल्या शिष्याचे जीवन घडवू शकतो, परिणाम- गुरु-शिष्य यांच्यातील भावनिक संबंध आजही अविरत आहेत. समाधान- गुरु-शिष्य यांच्यातील संतुलित आणि आदरयुक्त नातेसंबंधाद्वारे अराजकाच्या वाढत्या वादळावर नियंत्रण मिळवता येईल. भौतिक आणि आध्यात्मिक विकासासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. गुरु-शिष्य नात्याचे आदर्श रूप मांडून पुढच्या पीढिला तयार करावे लागेल. यातच सर्वांचे कल्याण आहे. असे मत ह भ प ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी बालकवी ठोंबरे शाळेतील माजी विध्यार्थी मेळाव्यात व्यक्त केले.
धरणगांव येथील बालकवी ठोंबरे विद्यालयात सन १९९० ते २०१७ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये मैत्री सोहळा, गेट-टुगेदर चा कार्यक्रम साजरा केला. या कार्यक्रमासाठी शहरातून एकूण १०० विद्यार्थी हजर होते. या वेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात जुन्या आठवणींना उजाळा देऊन एकमेकांची आस्थेवाईक चौकशी केली.
या कार्यक्रमात १९९० ते २०१७ सालातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. त्यांचा सत्कार या माजी विद्यार्थ्यांनी केला, कार्यक्रमाचें अध्यक्ष ह भ प ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, संस्थेचे अध्यक्ष हेमलाल भाटिया, उपाध्यक्ष चिंतामण पाटील, सचिव आर एन महाजन सर, मुख्याध्यापक प्राथमिक विभाग जीवन पाटील सर, माध्यमिक मुख्यध्यापक एस एस पाटील सर उपस्थित होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे मार्गदर्शन करुन भावी जीवनात यश संपादनाबरोबर भावी पिढी साक्षर व सुसंकृत कशी घडेल यावर मार्गदर्शन केले.
प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केलीत. सगळ्यात शेवटी सामूहिक भोजनासह मैदानी खेळांचा आनंद विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी लुटला. स्नेहभोजनाचा कार्यक्रम करून माजी विद्यार्थ्यांना मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना हॉल व्हावा म्हणून गुरुदक्षिणा हॉलसाठी विद्यार्थ्यांकडून देणगी देण्यात आली. यांत सुमारे 30 विद्यार्थ्यांनी देणगी दिली. त्यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमचे प्रस्ताविक महेश आहेराव सर यांनी केले तर आभार चव्हाण सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कैलास माळी सर, के वाय चौधरी सर, अनिल पाटील सर, पालखे सर, वाय बी पाटील सर, सौ तारे मॅडम, सचिन सूर्यवंशी सर आदि उपस्थित होते.