बालगंधर्व महोत्सवात ‘बहुत दिन बिते..’ बंदिशची अनुभूती ; २३ वा बालगंधर्व संगीत महोत्सवाची थाटात सुरवात
आज शास्त्रीय गायनासह कथक नृत्याची मेजवानी
जळगाव दि.3 प्रतिनिधी – शास्त्रीय संगीता बरोबरच उपशास्त्रीय संगीताची रेश्मा आणि रमैय्या भट यांनी मेजवानी दिली. हरहुन्नरी दोन्ही भगिनींची संगीत सेवा जुगल बंदितुन याची देही याची डोळा पाहण्याची व अनुभवण्याची संधी २३ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या निमित्ताने जळगावकर रसिकांना मिळाली. सर्व प्रथम राग पुरीया धनाश्री मधील विलंबीत एकतालातील बडा ख्याल ‘गावे गुणीजन’ तर द्रुत तीनतालातील ‘बहुत दिन बिते’ ही बंदिश सादर केली. त्यानंतर राग कलावतीमधील तिन तालातील बंदिश ‘सपनो में आया’ सादर झाली. त्यानंतर कानडा राग संगीतातील श्याम निने हे पद सादर केले. त्यानंतर पं.भिमसेन जोशी यांनी गाऊन अजमार केलेल्या दोन रचना नारायण भाग्यदा लक्ष्मी बारम्मा, बाजे मुरलिया बाजे रे यासह हे सूरांनो चंद्र व्हा व नारायणा रमा रमणा ह्या नाट्यटपदाने मैफिलीचा समारोप झाला. त्यांना संवादिनीवर अभिशेक रवांदे तर तबल्यावर रामकृष्ण करंबेळकर साथसंगत केली. तानपुरा वर अनघा गोडबोले, ऐश्वर्या परदेशी यांनी साथ संगत केली.द्वितीय सत्र जुगलबंदीने सादर झाले. यामध्ये कोलकाता येथील भाऊ व बहीणीने बासरी व गायनाची जुगलबंदी सादर केली. केवळ १५ वर्षांचा अनिरबन रॉय व त्याची बहिण मैत्रेयी रॉय हे ते दोन कलावंत सन २०२२ मध्ये कलर्स टिव्ही वरील गाजलेला रीऍलिटी शो ‘होनरबाज देश कि शान’ मधील आपल्या सादरीकरणाने अनिरबनने संपुर्ण भारताचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांना तबल्याची साथ कोलकात्याची रींपा शिवा यांनी केली.’ध्यास निरंतर स्वर साधनेचा’ या थिमवर असणारा, अभिजात संगीताचा, कान्हदेशच्या रसिकांच्या सांस्कृतिक कक्षा रुंदावणाऱ्या बालगंधर्व संगीत महोत्सवास आज आरंभ झाला. छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिरात सुरेल मैफिल रंगली. दीपक चांदोरकर यांनी सुरवातीला ‘गुरुवंदना’ सादर केली. गतवर्षी या जगाचा निरोप घेतलेल्या प्रभा अत्रे, पं. भवानी शंकर, रशीद खान, पं. झाकीर हुसेन इत्यादी कलावंतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्यावतीने व जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पु.ना. गाडगीळ ज्वेलर्स, जळगाव जनता सहकारी बँक, जाई काजळ, वेगा केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड, संस्कृती मंत्रालय भारत सरकार यांचे प्रायोजकत्व लाभलेल्या या महोत्सवास चांदोरकर टेक्नॉलॉजीसचे तांत्रिक सौजन्य लाभले असून रेडिओ पार्टनर माय एफ एम हे आहेत. दीपप्रज्वलनावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे रिजनल व्यवस्थापक ए व्ही रमण मूर्ती, जळगाव जनता सहकारी बँकच्या संचालिका आरती हुजूरबाजार, प्रा. शिल्पा बेंडाळे, गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. केतकी पाटील, माय एफ एम चे आर जे देवा, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि चे अवधुत घोडगावकर, व्हि एम भट, यांची उपस्थिती होती. स्व.चांदोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ विवेकानंद कुलकर्णी, उपाध्यक्ष दीपिका चांदोरकर, सचिव अरविंद देशपांडे, नूपूर खटावकर व पदाधिकारी यांनी मान्यवरांसह मंचावरील कलावंतांचे स्वागत केले.*आज कथक नृत्यासह शास्त्रिय गायनाची मेजवानी*श्रींजीनी कुलकर्णी (कथक) विवेक मिश्रा (तबला) सामी उल्लाह खान (गायन) प्राजक्ता गुर्जर (सतार) अश्विनी सोनी (पढंत) तर द्वितीय सत्रात अनिरुद्ध आयठल यांचे शास्त्रिय उपशास्त्रीय गायन त्यांना रामकृष्ण करंबेळकर (तबला) तर अभिनव रवंदे (संवादिनी) हे कलाकार आपली कला सादर करतील.