बोरगाव शिवारात आढळला तरुणाचा संशयास्पद मृतदेह ; जंगली प्राण्यांनी हल्ला करून ठार केल्याचा अंदाज
धरणगाव प्रतिनिधी.[अजय बाविस्कर]
धरणगाव -तालुक्यातील बोरगाव शिवारात तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला आहे. तरुणाचा डोकं व हात पाय नसलेला संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी जंगली प्राण्यांचे ठसे आढळून आले आहेत. यावरून बिबट्या किंवा जंगली प्राण्यांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.पोलीस निरीक्षक पवन देसले यांना घटनेची माहिती मिळताच ते सहकार्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले. बोरगाव शिवारात २२ ते २३ वर्षीय तरुणाचा डोकं व हात नसलेला विछिन्न अवस्थेत मृतदेह यावेळी पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी निरीक्षण केले असता बिबट्या सदृश्य प्राण्याचे पायाचे ठसे दिसून आले. त्यामुळे या तरुणाचा बिबट्याच्या हल्ल्यात किंवा अन्य जंगली प्राण्यांच्या तावडीत सापडल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून वर्तविले जात आहे. मृतदेह विछिन्न अवस्थेत असल्यामुळे तरुणाचा मृत्यू होऊन साधारण दोन ते चार दिवस झाले असावेत असा अंदाज लावण्यात येत आहे.