राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद

अनुभूती निवासी स्कूलमध्ये झालेल्या स्पर्धेत पश्चिम बंगाल उपविजेता
जळगाव, दि. १९ प्रतिनिधी : जळगावातील अनुभूती निवासी स्कूलमध्ये झालेल्या १७ वर्षाखालील मुलींच्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने विजेतेपद मिळवले. उपविजेता पश्चिम बंगालचा संघ ठरला. तिसरा क्रमांक सीआयएससीईच्या संघाला मिळाला. महाराष्ट्रातील मुलींनी ट्रॅडिशनल सिंगल, आर्टिस्टिक पेअर, रिदमिक पेअर या तीन प्रकारात सुवर्णपदक पटकवले. आर्टिस्टिक सिंगल प्रकारात पश्चिम बंगालला सुवर्णपदक तर महाराष्ट्राला कांस्य पदक मिळाले.
असे आहेत निकाल
सीआयएससीई नॅशनल स्कूल गेम्समध्ये राष्ट्रीय योगासन स्पर्धेचे उद्घाटन अनुभूती स्कूलमध्ये 17 जानेवारी रोजी झाले होते. तीन दिवसाच्या या स्पर्धेचा समारोप 19 जानेवारी रोजी झाला. या स्पर्धेत ट्रॅडिशनल सिंगल प्रकारात महाराष्ट्राच्या निरल वाडेकर हिला सुवर्ण, पश्चिम बंगालच्या आनया हुतीत हिला रौप्य तर सीआयएससीईच्या तनीशाला कांस्य पदक मिळाले. आर्टिस्टिक सिंगल प्रकारात पश्चिम बंगालच्या आनया हुतीत हिला सुवर्ण, सीआयएससीईच्या तनीशाला रौप्य तर महाराष्ट्राच्या आर्य सापते हिला कांस्य पदक मिळाले. आर्टिस्टिक पेअर प्रकारात महाराष्ट्राच्या निरल वाडेकर हिला सुवर्ण, मध्य प्रदेशातील पल्लवी हिला रौप्य तर सीबीएसई मंडळाची लेखिका चौधरी हिला कांस्य पदक मिळाले. रिदमिक पेअर प्रकारात महाराष्ट्राची तृप्ती डोंगरे हिला सुवर्ण, तामिळनाडूची मुजिता हिला रौप्य तर सीबीएसई मंडळाची लेखिका चौधरी हिला कांस्य पदक मिळाले.
पारितोषिक वितरण सोहळ्याच्या व्यासपीठावर अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, सीआयएससीईचे एक्झिकेटिव्ह तथा सचिव डॉ. जोसेफ इमॅनुअल, प्राचार्य देबासीस दास, सीआयएससीईचे सहसचिव अर्जित बासू, व्यवस्थापक अर्णव शॉ, मुख्य पंच डॉ. आरती पाल, एसजीएफआयचे मुख्य निरीक्षक रितू पाठक, जयदीप आर्य उपस्थित होते.
यावेळी सीआयएससीईचे एक्झिकेटिव्ह तथा सचिव डॉ. जोसेफ इमॅनुअल यांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, शारीरीक आणि सांस्कृतिक दृष्टीने योग अत्यंत महत्त्वाचा ठरतो. केवळ पंधरा मिनिटे योग केल्याने आपण रोगांपासून दूर राहू शकतो. शरीर, मन आणि आत्म्यासाठी आंतरीक समाधान तसेच आनंदासाठी योगा मोलाची भूमिका बजावतो. २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा होतो. कारण साऱ्या जगाला योगाचे महत्व पटलेले आहे. आपण सर्वांनी योगा आवश्य करावा, असा मोलाचा संदेश डॉ. इमॅनुअल यांनी दिला.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी ज्यांनी परिश्रम घेतले ते स्वयंसेवक, रेफरी आणि परीक्षक यांचा सत्कार करण्यात आला. त्यात सरीता मौर्य, चैताली मुखर्जी, सोनिका रॉय, विजय भागवत, डॉ.चेतन कुमार, डॉ.राजा, के. संतोष, के. गंगाधर, ओमप्रकाश, सिद्धार्थ किर्लोस्कर, हिमांशू पाठक, श्रीमती मिश्रा तसेच अनुभूती स्कूलचे सहकारी, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे सहकारी यांचा समावेश होता.


