राहुरी | राहुरी तालुक्यातील अवैध मुरुम वाहतूक नागरिकांच्या जिवावर बेतू लागली
प्रतिनिधी | आशिष संसारे, राहुरी
राहुरी फॅक्टरी ताहराबाद रस्त्यावर दहा दिवसात झालेल्या दोन अपघात एक महिला व एका पुरुषास आले कायमचे अपंगत्व…
पोलिस व महसूल प्रशासन आर्थिक तडजोडीमुळे कारवाई करण्यास धजवत नाही.
राहुरी महसुल विभागाने आर्थिक तडजोडीमुळे डोळ्यावर पट्टी बांधल्यामुळे अवैध मुरूम वाहतूक करणारे राजरोजसपणे मुरुम वाहतूक करीत असताना हि सर्वसामान्य नागरिकांच्या जिवावर बेतू लागली आहे. कनगर,चिंचविहिरे,ताहराबाद, गणेगाव,राहुरी कारखाना येथुन भरधाव वेगात होणाऱ्या अवैध मरुम वाहतूकीमुळे दहा दिवसात दोन अपघात झाले आहे.या अपघातात एक महिला व एक पुरुष कायमचे अधू झाले आहेत.अपघातानंतर अवैध मुरुम वाहतूक करणारे न थांबता सुसाट वेगाने निघुन जात असल्याने महसुल व पोलिसांबरोबर असलेल्या आर्थिक संबधामुळे त्यांची पाठराखण होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून कारवाईची मागणी होत असतानाही पोलिस व महसुल विभागाकडून कोणतीही कारवाई होत नाही.
अवैध मरुम वाहतूक अपघातास कारणीभूत ठरत आहे.अवैध मुरूम वाहतूक करणाऱ्या वाहनांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी येथिल नागरिकांनी केली आहे. राहुरी फॅक्टरी परिसरातून अवैध मुरूम वाहतूक राजरोजसपणे होत आहे.या वाहतुकीमुळे सतत होणाऱ्या अपघातांची मालिका बंद करण्याची मागणी राहुरी फॅक्टरी,चिंचविहिरे परिसरातील सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
राहुरी तालुक्यातील कनगर,चिंचविहिरे, ताहराबाद,गणेगाव व राहुरी फॅक्टरी येथील डॉक्टर तनपुरे कारखान्याच्या मालकीच्या जमिनीतून मोठ्या प्रमाणात मुरूम उत्खनन सुरू असून संबंधित मुरूम तस्करी करणारे लोक आपल्या ताब्यातील मोठमोठे वाहने नगर-मनमाड महामार्गावर मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने चालवत असल्याने परिसरात अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमावावा लागलेला आहे.तर काहींना कायमचे अपंगत्व आलेले आहे.दहा दिवसात झालेल्या अपघातात अजिंक्य वाणी तर चिंचविहीरे येथिल एका महिलेस कायम स्वरुपी अपंगत्व आले आहे.
याबाबत परिसरातील काही ज्येष्ठ व सुज्ञ नागरिकांनी वेळोवेळी राहुरीचे तहसीलदार व राहुरीचे पोलिस निरीक्षक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रारी दाखल केलेल्या आहेत. परंतू पोलिस व महसूल प्रशासन माञ अर्थपूर्ण संबंधामुळे संबंधित मुरूम तस्करांवर कोणतीही कारवाई करण्यास धजवत नाही. महसूल व पोलीस प्रशासनाला अवैध मरुम वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात अपयश येत असल्याने लवकरच तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा विविध सामाजिक संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे.