रेश्मा व रमैया भट (शास्त्रीय व उपशात्रीय गायन)
जळगांव : खानदेशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून संपूर्ण भारत वर्षात ख्यातनाम असलेला स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान आयोजित व संस्कृती मंत्रालय, नवी दिल्ली, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., भारतीय स्टेट बँक, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि., जळगाव जनता सहकारी बँक, सुहान्स केमिकल्स, जाई काजळ, वेगा केमिकल्स, चांदोरकर टेक्नॉलॉजीज (ओपीसी) प्रा. लि. होस्टिंग ड्युटी, पी एन जी सन्स लि. प्रायोजित २३ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन दि. ३, ४, ५ जानेवारी २०२५ रोजी करण्यात येत आहे.
रेश्मा व रमय्या भट यादव की भट सिस्टर्स या नावाने प्रसिद्ध असून कर्नाटक राज्यातील कुमठा तालुक्यातील मुरूरू या छोट्याशा खेड्यात त्यांचा जन्म झाला. आशा भट व रामचंद्र भट हे त्यांचे आई वडील. त्यांनी गायनाचे प्राथमिक संस्कार त्यांच्यावर केले त्यानंतर त्यांचे गुरु डॉ. अशोक हुग्गनवाऱ यांच्याकडे त्यांचे विधिवत गायनाचे शिक्षण सुरू झाले. यानंतरचे त्यांचे सांगितिक शिक्षण आयटीसी संगीत रिसर्च अकादमी येथे पंडिता शुभ्रा गुहा यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. रेश्मा व रमया दोघी अनुक्रमे आकाशवाणीच्या A व B ग्रेडच्या मान्यता प्राप्त कलावंत आहेत. आकाशवाणी धारवाड केंद्रावरून या दोन भगिनी आपल्या शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम सादर करीत असतात. दोन्ही भगिनी या उच्चशिक्षित असून रेशमा एमटेक व कॉम्प्युटर इंजिनिअर आहेत तर रमय्या इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी मध्ये ग्रॅज्युएट आहेत.
या दोन्ही भगिनींना डॉ. मंल्लिकार्जून मन्सूर राष्ट्रीय पुरस्कार, भारतीय फाउंडेशन चा गानज्योती पुरस्कार, कलाज्योती पुरस्कार तसेच युवा प्रतिभा पुरस्काराने सन्मानित आहेत. दोन्ही भगिनींना राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली असून आकाशवाणी स्पर्धा संगीत, भारतीय फाउंडेशन मेंगलोर आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले आहे. गंगुबाई हंगल फाउंडेशनच्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्यांना प्रथम पारितोषिक मिळाले आहे. आत्ता पर्यंत सवाई गंधर्व संगीत महोत्सव, पंचम निषाद महोत्सव, भारतरत्न पं. भीमसेन जोशी जन्मशताब्दी वर्षाचा कार्यक्रम, उत्तर दक्षिण संगीत समारोह, त्याचप्रमाणे अमेरिका, कॅनडा सह अनेक देशात आपले गायनाचे कार्यक्रम सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. शास्त्रीय संगीता बरोबरच उपशास्त्रीय संगीतावरही त्यांचे प्रभुत्व आहे.
अशा या हरहुन्नरी दोन्ही भगिनींनी संगीत सेवा याची देही याची डोळा पाहण्याची व अनुभवण्याची संधी २३ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या निमित्ताने जळगावकर रसिकांना मिळाली आहे. त्याचा त्यांनी लाभ घ्यावा अशी विनंती प्रतिष्ठानच्या विश्वस्तांसह प्रायोजकांनी केली आहे.