शिरसोली येथे उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिरामध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
जळगाव: तालुक्यातील शिरसोली या गावामध्ये दहा दिवसांचे भारतीय बौद्ध महासभेचे उपासीका धम्म प्रशिक्षण शिबिर सुरू आहे. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती असल्याने उपासिका शिबिरामध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव येथील भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा जळगाव पूर्वचे जिल्हा सरचिटणीस आयु. आनंद ढिवरे सर होते. सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित महिलांनी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आनंद ढिवरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल सविस्तर व्याख्यान दिले. बोलताना त्यांनी सांगितले की, “सावित्रीबाई फुले यांनी आयुष्यभर महिलांच्या शिक्षणासाठी काम केले आणि त्यांच्या कामाची फळ आज संपूर्ण भारतभरातील महिला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करून घेत आहेत.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा तालुक्याचे कोषाध्यक्ष आयु. यशवंत जाधव यांनी केले. तर आभार आयु. डोंगरे गुरुजी यांनी मानले.