श्री चिंतामणी मोरया परिसरातील रस्त्यांची दुर्दशा : कुणीही वाली नाही !
धरणगांव – शहराला लागून असलेल्या कॉलनी परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर मोठ मोठी डबकी साचली आहेत. येणाऱ्या जणाऱ्यांना यातून बिकट मार्ग काढावा लागत आहे. तर या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी कुणीच वाली नसल्याची परिस्थिति या ठिकाणी निर्माण झाली आहे.
धरणगांव शहराला लागून असलेला नवीन वस्तीच्या भागात कॉलनी परिसरात प्रशस्त अशी घरे बांधली गेली मात्र नगरपालिका हद्दी बाहेर असल्याने या कॉलनी परिसरात कोणत्याही सुविचा नगरपालिकेच्या वतीने देण्यात येत नाहीत. तसेच ज्या ग्रामीण भागात हा परिसर येतो त्या ग्रामपंचायत मार्फत देखील कोणत्याही सुविधा येथील नागरिकांना देण्यात येत नाहीत. त्यामुळे ‘घर का ना घाट का !’ अशी परिस्थिति या नागरिकांची झाली आहे.
धरणगांव शहराची हद्दवाढ गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. आजूबाजूच्या शहरातील हद्दवाढ झाली मात्र धरणगांव शहराची हद्दवाढ झाली नाही. त्यातच एरंडोल रस्त्यावरील कॉलनीतील रहिवाश्यांनी एकत्र येत नवीन ग्रामपंचायत डॉ. हेडगेवार ग्रामपंचायत मंजूर करून आणली. मात्र शहराच्या चिंतामण मोरया परिसरातील नागरिक मात्र हद्दवाढ अथवा ग्रामपंचायत पासून अलिप्त राहिले. यातच आता नवीन ‘श्री चिंतामण मोरया नगर’ ग्रामपंचायत व्हावी असा सुर परिसरात उमटू लागला आहे. मात्र सध्या तरी या परिसरातील नागरिक सोई सुविधानपासून वंचित आहे.
तात्पुरत्या स्वरूपात याठिकाणी मुरूम टाकून रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.