संत गोरोबाकाका मित्र मंडळाने केला स्त्री शक्तीचा सन्मान…

धरणगाव प्रतिनिधी / विनोद रोकडे
धरणगाव – येथील किरण टॉकीज परिसरातील श्री संत गोरोबाकाका दुर्गा मित्र मंडळाने शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जोपासत शेकडो गोर गरीब महिलांना साड्यांचे वाटप करून नवरात्रौत्सव साजरा केला.
अलीकडे सर्व उत्सावांच्या निमित्ताने भडक कार्यक्रम घेण्याची प्रथा सर्वदूर सुरु आहे. खऱ्या अर्थाने नवरात्र उत्सव म्हणजे स्त्री शक्तीचं प्रतिक मानला जातो. धरणगाव शहरातील किरण टॉकीज परिसरात असलेले श्री संत गोरोबाकाका दुर्गा मित्र मंडळ अनेक वर्षांपासून सांस्कृतिक परंपरा जपत आहे. शेण मातीने सारवणं, रांगोळ्या काढणं, पताका लावणं या गोष्टी मंडळाचे सर्व सदस्य स्वतः सहभागी होऊन करतात. मंडळाचे सर्व सदस्य कष्टकरी कुटुंबातील आहेत यामध्ये कोणीही आर्थिक दृष्टीने सक्षम नाही परंतु एकता प्रचंड मोठी आहे. यावर्षी देखील या मंडळाने आपली परंपरा कायम ठेवली आणि शेकडो गोर गरीब महिलांना साड्यांचे वाटप करून खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचा गौरव केला. देशात अनेक ठिकाणी महिलांवर होणारे अत्याचार बघता असं लक्षात येतं की समाजाची मानसिकता किती दुटप्पी स्वरूपाची आहे. एकीकडे नवरात्रीच्या निमित्ताने देवी म्हणून पूजा करायची आणि दुसरीकडे महिलांवर अन्याय – अत्याचार करायचे. या सर्व बाबींचा विचार करता संत गोरोबाकाका मित्र मंडळाचा आदर्श सर्वांनी आत्मसात केला तर निश्चितच सामाजिक भान जागृत करण्यासाठी व्यापक अर्थाने निश्चितच मदत होईल, यात तिळमात्र शंका नाही.
या स्तुत्य उपक्रम प्रसंगी धरणगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा युवासेना जिल्हाप्रमुख निलेश सुरेश चौधरी, पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, होमगार्ड समाधान पाटील, सामाजिक कार्यकर्ते अरविंद चौधरी तसेच संत गोरोबाकाका कुंभार दुर्गामाता मित्र मंडळाचे सर्व सदस्य व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.