धरणगावात आज शेवटच्या श्रावण मंगळवारी, मरीआई यात्रोत्सवात भव्य कुस्त्यांची दंगल

धरणगाव प्रतिनिधी / विनोद रोकडे
सालाबादाप्रमाणे येथील ग्रामदैवत असलेल्या श्री मरीआईचा श्रावणी यात्रा उत्सव सुरु आहे. श्रावणातील दर मंगळवारी येथील मरीआई मंदिर परिसरात यात्रा भरते. भाविक श्रध्दाळू आणि ग्रामस्थांच्या आस्थेचे केंद्र असलेल्या या यात्रेला पुरातन वारसा आहे. येथील मंदिर पुरातन असून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या निधीतून नुकताच त्याचा जिर्णोद्धार करण्यात आला आहे. श्रावणातली अंतीम यात्रा आज १९ ऑगष्ट मंगळवार रोजी संपन्न होत आहे. या यात्रेत पै. तुषार डुबे आणि पै. मलंग रहेरा यांच्यात खान्देश केसरीसाठी मुख्य कुस्ती होणार आहे. यासोबत पै. शारुख खान विरुध्द पै. माखन शर्मा, पै. ओम प्रकाश विरुद्ध पै. शमसाद शेख आणि पै. गौरव देवरे विरुद्ध पै. मोहित यादव यांच्या लढती देखील आखाड्यात आकर्षण ठरणार आहेत.
यात्रेनिमित्त मातीतील कुस्त्यांची दंगल ही परिसराची ओळख बनली आहे. या यात्रेत दारासिंग, पपडी पहलवान, सिध्दी पहलवान, बन्सी पहिलवान यांनी फड गाजविला आहे. स्थानिक वना पहिलवान, पुना पहिलवान, दौलत पहिलवान, छन्नू पहिलवान, जगन पहिलवान, प्रकाश पहिलवान, भगवान पहिलवान, वासूदेव पहिलवान, गुरु पहिलवान, सोमनाथ पहिलवान, पची पहिलवान ते आजचे भानुदास पहिलवान, राजू करोसिया पहेलवान यांच्या कुस्त्या मी पाहिल्या आहेत. कुस्तीच्या चाहत्यांसाठी ही एक पर्वणीच असते.
इतर सर्व यांत्रांमध्ये असते तशी रंगत, गंमत, जंमत या यात्रेलाही असते. माणसांनी फुललेला मंदीराचा परीसर, जवळच पाण्यानं तुडुंब भरलेला तलाव, तिथं वाजणारी वाद्ये, नारळ-प्रसादाच्या गाड्या, दुकानं, ती विकण्यासाठी चाललेली दूकानदारांची स्पर्धा, त्यांच्या खांद्यावर असलेल्या काठीला लावलेले रंगबिरंगी फुगे, बासरी, विविध खेळणी. यासोबत खवैय्यांसाठी मिठाई, गरमागरम भजी, गुडाची जिलेबी, गोडशेव, रेवड्या, चिक्कीची चंगळ. लेकरांसाठी बाईस्कोप, अनेक प्रकारचे खेळ, हवाई झोके, पाळणे, लाकडी घोडे, छोटी रेल्वे गाडीही ! गृहिणीसाठी गृहोपयोगी लाटणी, पोळपाट, पाटा, वरवंटा, हार, कंगणं, बांगड्या शृंगाराच्या विविध वस्तूंची रेलचेल असते. सर्वत्र माणसांची प्रचंड गर्दी, पाय ठेवायला जागा नाही अशी स्थिती. यामुळे या यात्रेचा प्रत्येकालाच फार आकर्षण आणि अप्रुप वाटतं. मातीतल्या रांगड्या कुस्तींसाठी आमच्या गावची यात्रा पंचक्रोशित प्रसिध्द. या यात्रेनेच आमच्या गावात पूर्वी अनेक तालमी गजबजलेल्या असायच्या. या तालमीतून पहिलवान अप्पा उस्ताद यांनी अनेक लहान मोठे मल्ल घडवले. यात्रोत्सव आला की ते व्यायामशाळेतून तयारी करायचे.
श्री व्यायाम प्रसारक मंडळ यांच्यातर्फे श्रावण महिन्यामध्ये दर मंगळवारी ग्रामदेवता मरीआईच्या यात्रेनिमित्त धरणगावातील तेली तलावाच्या पार्श्वभूमीवर भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात येते. या वर्षी यात खानदेश केसरी किताबसाठी शेवटच्या मंगळवारी नामवंत मल्लांची कुस्ती लावण्यात येणार आहे. यात्रेत देशभरातून विविध गटातील पहिलवान मंडळी येत असतात. कुस्तीगिरांसाठी धरणगावची कुस्ती दंगल एक पर्वणी असते.
यात्रेतील कुस्ती स्पर्धेत जास्तीत जास्त पैलवानांनी भाग घेऊन तसेच उपस्थिती देवून कुस्ती कलेला प्रोत्साहन द्यावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष भानुदास विसावे, उपाध्यक्ष मंगलदास भाटिया, सचिव प्रशांत वाणी, विलास येवले, खजिनदार कमलेश तिवारी त्याचप्रमाणे व्यायाम प्रसारक मंडळाचे जेष्ठ संचालक सुरेशनाना चौधरी, गुलाबराव वाघ, जीवनआप्पा बयस, ज्ञानेश्वर महाजन, संजय महाजन, देवा महाजन, प्रकाश पाटील, शरद भोई, किशोर वाणी, किरण वाणी, दिनकर पाटील, किशोर भावे, नारायण महाजन, गुरु पहलवान, गोपाल पाटील, किशोर महाजन, भास्कर मराठे आणि मंडळाचे सर्व सभासदांनी आव्हान केले आहे.