श्रमसंस्कारातून राष्ट्रविकासाचे प्रशिक्षण देणारे व्यासपीठ म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना : प्राचार्य डॉ.विजय कुलकर्णी

देगलूर (प्रतिनिधी) भीमराव दिपके : परिश्रम हा मानवी जीवनाचा मौल्यवान दागिना असून श्रमसंस्कारातून राष्ट्र विकासाचे प्रशिक्षण देणारे महत्त्वाचे व्यासपीठ म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना होय, असे मत प्राचार्य डॉ. विजय कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
वैकुंठवासी धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयात २४ सप्टेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त आयोजित उद्बोधन शिबिरात अध्यक्षीय समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. दिगंबर कुलकर्णी, डॉ. भास्कर कोशीडगेवार, प्रमुख मार्गदर्शक डॉ. मारुती बामणे, डॉ. भीमराव माळगे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. पुढे बोलताना प्राचार्य डॉ. विजय कुलकर्णी म्हणाले की, युवाशक्तीतील उर्जेला सकारात्मक परिश्रमाची जोड दिल्यास अनुकूल समाज परिवर्तन घडवून येते व त्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे नियमित तसेच वार्षिक शिबिरातील विविध उपक्रम पूरक ठरतात. याप्रसंगी मार्गदर्शक डॉ. भीमराव माळगे म्हणाले की, स्वच्छता आणि आरोग्य याचा निकटचा संबंध असून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ग्राम स्वच्छतेचे प्रकल्प यशस्वीपणे राबविल्यास अनारोग्याची समस्याच राहणार नाही. कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून कृषी विकासाचे एखादे मॉडेल किंवा प्रारूप बनवण्याचे प्रयत्न रा.से.यो. विभागातर्फे केले पाहिजेत, अशी अपेक्षा मार्गदर्शक डॉ. मारुती बामणे यांनी आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केली. रा.से.यो. समन्वयक डॉ. भास्कर कोशीडगेवार यांनी प्रास्ताविकातून राष्ट्रीय सेवा योजनेचा इतिहास प्रतिपादन करून या कार्यक्रमाचे औचित्य व उद्देश कथन केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.एस्सी. तृतीय वर्गातील कुमारी अश्विनी गायकवाड या विद्यार्थिनींनी केले तर आभार समन्वयक डॉ. दिगंबर कुलकर्णी यांनी मानले.