बीड – संसाराची राख रांगोळी झालेल्या ऊसतोड कुटुंबाला राखेतून सावरण्यासाठी अनेकांचे हात सरसावले !
हिंदू-मुस्लिम ग्रुपने जमा केलेले सव्वा लाख रुपयांची मदत पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या हस्ते सय्यद कुटुंबाला सुपूर्द
लोकनायक न्युज प्रतिनिधी -महादेव काळे,
केज – अवघ्या दोन दिवसांवर मुलाचे लग्न आलेले असताना आणि उसतोड मजुराच्या घरात लग्नाची लगबग सुरू असतानाच अचानक घराला लागलेल्या आगीत लग्नाचा बस्ता, दागिने, किराणा सामान आणि सर्व संसार जळून एका उघड्यावर पडलेल्या मुस्लिम कुटुंबाला गावकरी आणि अनेकांनी मदत करून जळून राख झालेल्या कुटुंबाला उभे राहण्यासाठी मदत केली. तसेच शेख जावेद यांच्या हिंदू मुस्लिम ग्रुपने जमा केलेले सव्वा लाख रु. सहाय्याक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या हस्ते शेख या आपतग्रस्त कुटुंबाला देण्यात आली.त्याचे असे झाले की शुक्रवार दि. ७ जुलै रोजी सायंकाळी ७:३० च्या दरम्यान केज तालुक्यातील साळेगांव येथील उसतोड मजूर सय्यद शफीक दगडू यांच्या पत्र्याच्या घराला आग लागली. त्यात त्यांनी त्यांचा मुलगा सय्यद रसूल शफीक यांच्या लग्नासाठी खरेदी केलेले कपडे, लग्नाचा बस्ता, नवरी मुलीसाठी खरेदी केलेले सोन्याचे दागिने, किराणा सामान आणि रोख रक्कम हे जळून खाक झाले. घराला आग लागल्या नंतर ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. परंतु आग आटोक्यात आणण्यात अपयश आले. आगीच्या संदर्भात केजच्या नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड, तहसीलदार अभिजित जगताप, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांना माहीती मिळताच त्यांनी अग्निशामक विभागाला माहिती दिली. मात्र अग्निशामक दलाची गाडी पोहोचे पर्यंत घर आणि आतील सर्व सामान जळून खाक झाले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. मात्र आगीत घर आणि सर्व सामान जळून मोठे आर्थिक नुकसान झाले होते. रविवार दि. ९ जुलै रोजी त्यांचा मुलगा सय्यद रसूल याचे गेवराई तालुक्यातील तलवडा येथील मुलीशी मज्जीद मध्ये मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न पार पडले.मात्र त्या नंतर सय्यद शफीक आणि त्यांचा नवविवाहित मुलगा व सून यांना राहण्यासाठी घर आणि खाण्या-पिण्याची कशी व्यवस्था करावी. ही समस्या भेडसावत होती. सय्यद कुटुंबाची ही अडचण माहीत होताच गावातून काही जणांनी धान्य, पीठ, मीठ, मिरची, तेल असे किराणा साहित्य दिले. तर माजी आमदार पृथ्वीराज साठे, विष्णू घुले, नंदकिशोर मुंदडा, सरपंच कैलास जाधव, माजी उपसरपंच अमर मुळे, डॉ भालेराव आणि त्यांचे मित्र यांनीही आर्थिक मदत केली.परंतु सय्यद कुटुंबाचा आगीच्या राख रांगोळीत भस्म झालेला आणि उघड्यावर आलेला संसार सावरण्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याने सरगम बँजो पार्टीचे मास्टर जावेद शेख आणि त्यांचे मित्र रत्नाकर राऊत, शेख मुन्ना यांनी सुमारे सव्वा लाख रु. रोख रक्कम जमा केली. शेख जावेद यांनी जमा केलेली मदत सव्वा लाख रु. गुरुवार दि. १३ जुलै रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या हस्ते सय्यद शफीक यांचे नवविवाहित रसूल याकडे सोपविण्यात आले. यावेळी पत्रकार गौतम बचुटे, शेख इलाही, सोनू बचुटे, रत्नाकर राऊत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेषेराव यादव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुकुंद ढाकणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.या मदतीमुळे आगीत संसार मोडून पडलेले सय्यद कुटुंब भावुक झाले. तर सर्वांच्या मदतीमुळे सय्यद कुटुंबाला आगीच्या राखेतून संसार सावरण्यासाठी मदत होणार आहे.