ताज्या बातम्या

चोपडा तालुक्याला औद्योगिक परिवर्तनातून रोजगार वाढीची नितांत आवश्यकता ! – शुभम सोनवणे

प्रतिनिधी विनायक पाटील

चोपडा तालुका मोठ्या प्रमाणात शेती व्यवसायावर अवलंबून असलेला तसेच केळी, कापूस लागवड करणाऱ्या शेतकरी वर्गाचा तालुका गणला जातो. आजच्या काळात शेतात स्वत: राबून शेती करणाऱ्या शेतकऱ्याची अवस्था ही बिकट होत चालली आहे. त्यात नैसर्गिक आपत्त्ती, वारा वादळासह अवकाळी पाऊस, शेतीमालाला कमी हमी भाव, खंडीत वीजप्रवाह, शेतात काम करणाऱ्या मजुरांची संख्या कमी होणे यासारख्या असंख्य अडचणींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. या सर्व अडचणींना तोंड देत असतांना प्रत्येक शेतकरी किंवा ग्रामीण भागात वास्तव्य करणाऱ्या मजूर वर्गाला आपण सोसत असलेल्या हाल अपेष्टा आपल्या मुलांच्या वाटेला येऊ नयेत म्हणून त्यांना चांगले शिक्षण देऊन नोकरी करण्याच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून आपल्या मुलांनी देखील शहरात शिक्षण घ्यावे अशी इच्छा मनात जागृत होणे स्वाभाविक आहे. शहरातील शिक्षणाचा दर्जा हा ग्रामीण भागातील सरकारी शाळांमधील शिक्षणापेक्षा वाढीव असतो असा समज देखील ग्रामीण भागात वाढलेला दिसत आहे. पण घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीशी झुंज देऊन सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेतलेल्या कित्येक विद्यार्थ्यांनी आज आपल्या जीवनात उच्च पदावर नाव कमावलेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे प्रत्येकाचा आपल्या आर्थिक स्थिती नुसार आपल्या मुलांच्या भविष्याला वळण लावण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहे. शेतीत राबून घरच्या आर्थिक खर्चाला टाच मारून मुलांना चांगले शिक्षण देण्याच्या दृष्टीकोनातून कौतुकाची बाब प्रामुख्याने ग्रामीण भागातून पाहायला मिळत आहे. मे चा महिना म्हणजे शाळेत प्रवेश करण्याचा महिना असल्या कारणाने तालुक्यातील ग्रामीण भागात वास्तव्य करणारा शेतकरी वर्ग आजच्या वाढत्या आधुनिकीकरणाच्या तसेच विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या पाल्यांना देखील शहरात शिक्षण घेता यावे या इच्छेने त्यांचा दाखला शहरातील नामांकित शाळांमध्ये घेतांना दिसत आहेत. शाळेत दाखला घेतल्यानंतर शहरात मुलांच्या शिक्षणाकरिता खोली घेण्यासह अन्य खर्च त्यामध्ये मोडलाच जातो. म्हणजे शेतकरी राजाला शेतीचा आर्थिक भार व मुलांच्या शिक्षणाला लागणारा शहरातील खर्च अधिकचा वाट्याला येतो. अखेरीस, मुले उच्च माध्यमिक विद्यालया पर्यंत, डिग्रीचे किंवा डिप्लोमा चे शिक्षण घेई पर्यंत शहरात शिक्षण घेतात त्या नंतर मात्र नोकरीच्या शोधात मुलांना मुंबई, पुणे, नाशिक किंवा अन्य रोजगार उपलब्ध असलेल्या ठिकाणी स्थलांतरित व्हावे लागते. उपजीविकेच्या शोधात आपण जन्म घेतलेल्या मातृभूमी पासून तसेच त्यांचे संगोपन करत उतार वयात गावी शेती करत असलेल्या आई वडिलांपासून मुलांना रोजगार करिता भटकंती करावी लागते. त्यामुळे बाहेर नोकरी करत असलेल्या मुलांना स्वत:च्याच आई वडिलांना भेटायला वर्षातून किमान तीन ते चार वेळेस सुटी काढून गावी यावे लागते, किंवा मुलगा आई वडिलांना सोबत घेऊन गेला तर घराला कुलूप लागते यामुळे मोठ्या शहरात आपल्याला मोठ्या प्रमाणात खानदेशी पाहायला मिळतात, अशी अवस्था आपण पाहत आहोत. तालुक्यातील कुठल्याही चावडीवर रोजगाराचा व विकासाचा विषय निघाला की वेळोवेळी शिरपूर, अमळनेर या तालुक्यांचा दाखला दिला जातो ही परिस्थिती आपल्या तालुक्यातून बदलणे आवश्यक आहे. एकाच शहरात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढणे म्हणजे नैसर्गिक स्त्रोत व संसाधनाचा तुटवडा म्हणजेच स्त्रोत उपलब्ध करण्यासाठी पदार्थामध्ये भेसळ, रसायन वापरलेला भाजीपाला, वाहनांचे वाढते प्रमाण पर्यायाने प्रदूषण वाढ व जीवितास धोका, पिण्याच्या पाण्याचा तुटवडा, परिणामाने महागाईची झळ, वास्तव्यास जागा व्हावी म्हणून मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड परिणामाने तापमानात वाढ या गोष्टीना गाव सोडून गेलेल्या नागरिकांना सामोरे जावे लागते. मध्यम पगारात मोठ्या शहरात उदर निर्वाह करणे म्हणजे “काटेवरची कसरत” असे बोल शहरातील नोकरी करणाऱ्या नागरिकांकडून ऐकायला मिळतात. या सर्व अडचणी फक्त गावाकडे तालुक्याच्या स्तरावर उद्योग धंदे, कारखाने, लघु मध्यम व मोठ्या स्वरूपातील स्टार्ट अप प्रकल्पाबद्दल असलेली कमी जागरुकता, प्रकल्पाकरिता केंद्र सरकारच्या स्टार्ट अप इंडिया सारख्या योजनाच्या माहितीचा अभाव, एम एस एम ई अंतर्गत उद्योग धंद्या करिता मिळणारे कर्ज, या सारख्या तालुक्यात रोजगाराच्या कमी संधी मुळे उच्च विद्या विभूषिताना गाव सोडून मोठ्या शहराकडे स्थलांतरित व्हावे लागत आहे. या मुळे कालांतराने गावी शेती करत असलेले पालक वृद्ध झाले की शेतीत अंग मेहनत करणे कठीण होते व गावाकडे शेतीत लक्ष देणारे कोणी नसल्यामुळे वाड वडिलांपासून राखत आलेली शेती विकायची वेळ येते. पण जर तालुक्याची भौगोलिक परिस्थिती, जलसाठे व नैसर्गिक संसाधन व स्त्रोतांचा वापर होऊन सहकारी तत्वावर किंवा खाजगी कारखाने तालुक्यात उदयास आले तर वर नमूद केलेल्या अडचणी मोठ्या प्रमाणात कमी व्हायला नक्कीच मदत होऊ शकते व अन्नाच्या शोधात गावाकडच्या मातीत वाढलेल्या आपल्या भाऊ बांधवाना मोठ्या शहरात परस्थानी उदर निर्वाहाकरीता जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे तालुक्यातील राजकारणात वर्चस्व असलेल्या सर्वच स्तरावरील लोक प्रतिनिधींनी व सुजाण नागरिकांनी तालुक्याला औद्योगिक परिवर्तनाची नितांत आवश्यकता असल्याची बाब लक्षात घेऊन सुशिक्षित बेरोजगार तरुणाई करिता उद्योग धंद्यांची व उत्पादन कारखान्यांची वाढ होण्याच्या दिशेने विचार करणे गरजेचे झाले आहे. असे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे शहर अध्यक्ष शुभम सोनवणे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *