क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या संख्येने साजरा करण्याचे आवाहन

धरणगाव : क्रांतिसूर्य समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर समस्त माळी समाजात उत्साह, एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अनुषंगाने दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी रात्री ९.३० वाजता लहान माळीवाडा, धरणगाव येथील समाज मंदिरात समस्त माळी समाज अध्यक्ष व पंचमंडळ यांच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण सर्वसाधारण बैठक उत्साहात संपन्न झाली.या बैठकीत येत्या ११ एप्रिल २०२६ रोजी साजऱ्या होणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले जयंती निमित्त भव्य महा रॅली व मिरवणुकीचे सुसूत्र नियोजन करण्यात आले. रॅलीचा मार्ग, वेळापत्रक, शिस्तबद्ध आयोजन तसेच विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांवर सखोल चर्चा करण्यात आली. समाजातील एकोप्याला अधिक बळकटी देण्यासाठी आणि नव्या पिढीला महात्मा फुले यांच्या विचारांची प्रेरणा मिळावी यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले.यावेळी अध्यक्षांनी विशेष आवाहन करत सर्व समाज बांधवांनी महिलांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पवित्र व प्रेरणादायी सोहळ्याला यशस्वी करावे, असे सांगितले. महिला सहभागामुळे समाजातील एकात्मता अधिक दृढ होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.सामाजिक ऐक्य, संघटनात्मक शक्ती आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या क्रांतिकारी विचारांचा प्रभाव या बैठकीत प्रकर्षाने जाणवला. लहान माळीवाडा पंचमंडळाच्या समाज मंदिरात पार पडलेली ही बैठक अत्यंत उत्साहपूर्ण, प्रेरणादायी आणि यशस्वी ठरली.

