ताज्या बातम्या

धारशेरी येथील उपक्रमशील शिक्षक निलेश सोनवणे यांना राज्यस्तरीय “नवंविचार रत्न गौरव पुरस्कार प्रदान”

धरणगांव प्रतिनिधी / विनोद रोकडे

धरणगांव – विचारांची नवी दिशा देणाऱ्या लाइव्ह नवं विचार न्यूजच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष सोहळ्यात शिक्षण व सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान देणारे माध्यमिक विद्यालय धारशेरी, ता.धरणगांव येथील उपक्रमशील शिक्षक श्री. निलेश साहेबराव सोनवणे यांना “नवं विचार रत्न गौरव पुरस्कार” या प्रतिष्ठित राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रांत सकारात्मक बदल घडवणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये श्री. निलेश साहेबराव सोनवणे यांचे कार्य विशेष ठरले. त्यांनी शिक्षण क्षेत्रात केवळ ज्ञान देण्यापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये मूल्यसंस्कार, आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्यावर भर दिला आहे.तसेच नव नवीन विचारांनी ते शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात. सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी वंचित घटकांपर्यंत मदत पोहोचवून समाजसेवेचा आदर्श निर्माण केला आहे.सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय असून, समाजातील विविध घटकांमध्ये शिक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे, युवकांना योग्य दिशा देणे आणि समाजोपयोगी उपक्रमांना चालना देणे यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत.
विशेष म्हणजे, श्री.निलेश सोनवणे यांनी आपल्या कार्यातून “नवा विचार, नवी दिशा” हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थी व समाजापर्यंत पोहोचवला आहे. त्यांच्या उपक्रमांमुळे अनेक विद्यार्थी प्रेरित होऊन त्यांच्यात शैक्षणिक बदल घडून येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पुरस्कार स्वीकारताना त्यांनी नम्रपणे सांगितले, “हा सन्मान माझ्यासाठी केवळ गौरव नसून जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. विद्यार्थी व समाजासाठी काहीतरी वेगळं आणि परिणामकारक करण्याचा माझा प्रयत्न कायम राहील” या पुरस्काराचे मानकरी ते ठरल्याने पंचक्रोशीतील सर्व बांधव व त्यांच्या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक वृंदांनी श्री. निलेश सोनवणे यांच्या कार्याचे विशेष कौतुक करत, त्यांच्या योगदानामुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडत असल्याचे मत व्यक्त केले. या राज्यस्तरीय पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याला अधिक व्यापक व्यासपीठ मिळणार असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *