ब्रेकिंग

भाजप च्या १० नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

लोकनायक न्यूज नेटवर्क

जळगाव – मुक्ताईनगर येथील नगरपंचायतीमधील माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे समर्थक असणार्‍या सहा नगरसेवकांनी आज मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तर चार नगरसेवक उद्या प्रवेश घेणार आहेत.

मुक्ताईनगर नगरपंचायतीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेले आहे. यात नजमा तडवी या लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या असून यासोबत भाजपचे १२ नगरसेवक निवडून आले होते. हे सर्व नगरसेवक हे खडसे गटाचे समर्थक आहेत. एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतरही येथील नगराध्यक्षा व इतर नगरसेवकांनी पक्षांतर केले नव्हते. अर्थात, ते खडसे समर्थक म्हणूनच ओळखले जात होते. मात्र अलीकडच्या काळात सत्ताधारी गटात कुरबुरी सुरू झाल्या. यातच दोन दिवसांपूर्वी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून मंजूर करण्यात आलेल्या कामांना बहुमताने मंजुरी देण्यात आल्याने राजकीय धुरिणांच्या भुवया उंचावल्या होत्या. याप्रसंगी नगराध्यक्षांसह सहा नगरसेवकांनी शिवसेनेला साथ दिल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात आले होते. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही केले होते. या पार्श्‍वभूमिवर, आज मुक्ताईनगर नगरपंचायतीतील दहा नगरसेवक हे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत दुपारी मातोश्रीवर दाखल झाले. यातील सहा नगरसेवकांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले. तर चार जणांचा प्रवेश उद्या होणार आहे.

 

मार्च महिन्याच्या अखेरीस जळगाव महापालिकेतील भाजपची सत्ता संपुष्टात आणून शिवसेनेचा भगवा महापालिकेवर फडकला होता. यात थेट भाजपमध्ये उभी फूट पडून एक मोठा गट शिवसेनेत दाखल झाला होता. यामुळे उडालेली खळबळ शांत होत नाही तोच मुक्ताईनगरातही हाच पॅटर्न राबविण्यात आल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार चंद्रकांत पाटील यांनी हे प्रवेश घडवून आणल्याचे स्पष्ट होत आहे.

जिल्हा परिषदेतही मध्यंतरी सत्तांतराचे वारे वाहू लागल्याचे दिसून आले होते. याची चर्चा सध्या थंडावली असली तरी मुक्ताईनगरातील सत्तांतरामुळे जिल्हा परिषदेतही सत्तांतर होणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आज प्रवेश केलेल्या नगरसेवकांमध्ये मुक्ताईनगरमधील पियुष महाजन, संतोष कोळी, मुकेश वानखेडे आणि अन्य ३ जणांचा समावेश असून ४ नगरसेवक उद्या शिवबंधन बांधणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जळगाव जिल्ह्यात भाजप साठी येणारा काळ काय घडामोडी घडविणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे !!!

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे