आदिवासी बोलीभाषेमुळे वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी; डॉ.चव्हाण यांचा प्रजासत्ताक दिनी सत्कार
नंदुरबार प्रतिनिधी – राहुल शिवदे
तळोदा – तालुक्याला मिळालेले अलौकिक रत्न, आरोग्य दुत म्हणुन ख्याती असलेले तळोदा तालुका आरोग्य अधिकारी मा.डॉ.महेंद्र चव्हाण यांना भारताच्या ७५ वा प्रजासत्ताक दिनी जिल्हा परिषद नंदुरबार येथे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले. यामुळे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव केला जातो आहे.
नंदूरबार जिल्ह्यातील आरोग्य विभागात मिशन ८४ दिवस मोहीम अंतर्गत तसेच तळोदा तालुक्यात संस्थात्मक प्रसुती प्रमाण वाढवणे, माता मृत्यू , बालमृत्यू दर कमी करणे, तसेच अर्भक मृत्यू दर कमी करणे यात यशस्वी काम केल्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले आहे.
डॉ. महेंद्र चव्हाण हे गेल्या पाच वर्षापासुन आरोग्य विभागातील महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांना तळोदा तालुक्याच्या आरोग्य विभागाची खडांखडा माहीत आहे. तसेच आरोग्य विभागात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी, ए.एन.एम, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, मदतनीस , आशा सेविका ई. कर्मचाऱ्यांकडून सुसूत्रता पूर्वक काम करून घेण्याचे मोठे कौशल्य आहे. तसेच आदिवासी बोली भाषा देखील ज्ञात असून, तळागाळातील नागरिकांमध्ये जाऊन त्यांच्याच बोलीभाषेत आरोग्याविषयी सल्ला देत असल्याने त्याचाच फायदा म्हणून त्यांना जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे ते आरोग्य दुताच्या वेशात ‘देवदूत’ म्हणुन तालुक्याला लाभले असल्याची चर्चा सर्वत्र पसरली आहे. त्यामुळे त्यांना मिळालेल्या सन्मानाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.