आश्रमशाळा संघटनेचा ॲड.संदीप गुळवे यांना जाहीर पाठिंबा : अध्यक्ष विक्रम गायकवाड
प्रतिनिधी विनायक पाटील
आश्रमशाळेची वेळ आणि विविध प्रश्न घेऊन २६ जून रोजी होणाऱ्या विधान परिषद शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शासनमान्य आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेने कृतिशील सहभाग घेतला असून महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड.संदीप गोपाळराव गुळवे यांना प्रथम पसंतीचे मत देण्याचा निर्णय घेऊन गुळवे यांच्या समर्थनार्थ पाठिंबा जाहीर करण्यासाठी आयोजित केलेल्या शिक्षकांचा मेळावा २३ जून वार रविवार रोजी जळगाव येथील अभियंता भवन येथे आयोजित करण्यात आला होता. शासनमान्य आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष विक्रम गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती मेळाव्याला लाभली होती. आश्रमशाळा कर्मचाऱ्यांची आदिवासी विकास मंत्र्यांनी सतत अवहेलना केली असून कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास दिलेला आहे.त्यामुळेच सर्व शिक्षक लोकसभा आणि आत्ता विधानपरिषद निवडणुकीत आश्रमशाळा कर्मचारी पेटून उठला असून मतपेटीतून आपली भावना व्यक्त करणार आहे.तसेच भारतीय जनता पार्टी कडे असलेल्या आदिवासी विकास विभाग खात्याचे मंत्री मुख्यमंत्र्यांचे तरी ऐकतील का? यावर गायकवाड यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.ते पुढे म्हणाले या मंत्र्यांनी नेहमीच सत्तेवर आल्यावर कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक अशी शाळेची वेळ लागू केली.११ते ५ ही वेळ व्हावी ही प्रामुख्याने मागणी सातत्याने कर्मचाऱ्यांनी लावून धरली. वेतनाचे हिशोब,जुनी पेन्शन योजना,महिला कर्मचाऱ्यांच्या समस्या,वसतीगृह विभाग वेगळा व्हावा.यावर संघर्ष सुरूच आहे , मात्र हे सारं असताना देखील विद्यमान शिक्षक आमदार यांनी याकडे लक्ष दिले नाही.आता भर निवडणुकीच्या प्रचारात आश्वासनांची खैरात वाटली जात आहे.
शिक्षकांच्या पगारातून वजा होणाऱ्या १०% टक्के रकमेच्या व शासन जमा करीत असलेल्या १४% टक्के रकमेचा हिशोबच आश्रमशाळा कर्मचाऱ्यांना मिळाला नसून डी.सी.पी.एस. हिशोब काय असतो? याबाबतीत एकदाही विधानपरिषदेत निवेदन केले नाही भारतीय जनता पार्टीचे सर्वेसर्वा तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बऱ्याच वेळेला भेट घेण्याचे संघटनेने प्रयत्न केले पण त्यांनी संघटनेला कधी वेळ दिला नाही.या देशात लोकशाही आहे आणि लोकशाही काय करू शकते हे आत्ताच झालेल्या निवडणुकीत आपण पाहिले असून आता मात्र वेळ आली आहे ती या सत्ताधाऱ्यांना मत पेटीतून उत्तर देण्याची अशी भावना विक्रम गायकवाड यांनी बोलून दाखवली.सर्व कर्मचाऱ्यांनी कुठल्याही अमिषाला बळी न पडता ॲड.संदीप गोपाळराव गुळवे यांना पहिल्या पसंतीचे मत देण्याचे आवाहन आदिवासी विकास विभाग अनुदानित कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष राजेश पाटील यांनी केले.संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज ठाकरे यांचे नियोजनातून सदर मेळावा पार पडला.यावेळी मंचावर प्रकल्प अध्यक्ष प्रशांत बोदडे,नाशिक विभागीय कार्यकारणी सदस्य चंद्रकांत पाटील,देवेंद्र चौधरी,अविनाश अहिरे,शबाना तडवी हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचलन गजानन पाटील यांनी केले तर आभार अनुदानित आश्रमशाळा पिंपळे येथील माध्यमिक मुख्याध्यापक उदय पाटील यांनी केले.यावेळी नाशिक शिक्षक भारतीचे कार्यवाहक विनायक लाड उपस्थित होते.