चोपड्यातील BSF जवान चेतन चौधरी मणिपूरमध्ये शहीद

चोपडा प्रतिनिधी / विनायक पाटील
चोपडाशहरातील रहिवासी व सध्या मणिपुरमध्ये सीमा सुरक्षा दलात (BSF) कार्यरत असलेले चेतन पांडुरंग चौधरी हे जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली असून मणिपूरच्या सेनापती जिल्ह्यात झालेल्या एका दुर्दैवी अपघातात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. दरम्यान, आज 15 मार्च रोजी सकाळी त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला
याबाबत अधिक माहिती अशी की मणिपूर राज्यातील अतिसंवेदनशील भागात 37 बीएन बीएसफची तुकडी कार्यरत होती. दरम्यान, ड्युटीवरून परत येत असताना 11 मार्च रोजी इम्फाळ-दिमापूर राष्ट्रीय महामार्गावरील सेनापती जिल्ह्यातील चांगौबुंग या गावात ट्रक दरीत कोसळल्याने 2 जवानांचा जागीच तर एका जवानाचा रूग्णालयात नेत असताना मृत्यू झाला होता. यासोबतच इतर 13 जखमी जवानांवर इम्फाळमधील रूग्णालयात उपचार सुरू होते चोपड्यातील बीएसएफ जवान चेतन चौधरी शहीद तसेच जखमी जवानांमध्ये जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातील रहिवासी चेतन पांडुरंग चौधरी यांचा समावेश होता. गेल्या चार दिवसांपासून चेतन चौधरी यांच्यावर उपाचार सुरू होते. मात्र, आज 15 मार्च रोजी सकाळी त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी उपचार दरम्यान अखेरचा श्वास घेतला. सोमवारी 16 मार्च रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.
चेतन पांडुरंग चौधरी हे गेल्या 12 वर्षांपासून सीमा सुरक्षा दलात कार्यरत होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी तसेच आई-वडील, एक भाऊ आणि बहिण असा परिवार आहे. दरम्यान, चेतन चौधरी यांच्या शहीद होण्याची बातमी कळताच परिसरात शोककळा पसरली आहे.