जळगांव – अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान !..
पालकमंत्र्यांनी तात्काळ तहसिलदार यांना पंचनामा करण्याचे आदेश द्यावेत – गोरख देशमुख [ तालुकाध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा ]
धरणगाव – शहरातील व ग्रामीण भागातील होळीच्या सणाच्या दिवशी अवकाळी व वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. यामध्ये शेतकऱ्यांचे गहू, मका पिकाचे सर्वच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे.
बाभळे, गारखेडा, आनोरा, धानोरा, धरणगाव, शिवार, गंगापुरी, पष्टाने, वंजारी, खपाट, पथराड, बोरखेडा, विवरे, भवरखेडे, हिंगोणे, कल्याणेहोळ, पिंप्री तसेच सर्वच धरणगांव तालुक्याला या अवकाळी पाऊस व वादळाचा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. आधीच कापसाचे भाव कमी असल्याने शेतकरी राजा नाराज होता. शेतकरी राजा हा दिवस – रात्र मेहनत करून आपल्या पिकाचे संगोपन करीत असतो रात्री – अपरात्री पाणी भरतो. थंडीच्या दिवसात आपल्या जीवाची परवा न करता त्या पिकाला लेकरासारखं वाढवतो. कापसाचे दुःख सावरत नाही तोवर कालच्या अवकाळी पावसाने शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे. यासाठी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील साहेब यांना विनंती आहे की, आपण तात्काळ तहसीलदारसो. यांना पंचनामा करण्याचे आदेश तात्काळ द्यावेत व शेतकऱ्यांचा पिकांची झालेली हानी भरून निघावी. नुसते पंचनामे करून फायदा होणार नाही तर शेतकऱ्यांना ठोस मदत मिळायला हवी यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष गोरख देशमुख यांनी मागणी केली आहे.