जळगाव जिल्हा रुग्णालयात नाशिकच्या ‘गृहलक्ष्मी’ चा घोटाळा

सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनील बन्सी यांची तक्रार
जळगांव / राज्यातील विविध जिल्हा शासकीय रुग्णालयांना सेवा आणि साहित्य पुरवठा करण्याचे कंत्राट घेणाऱ्या नाशिक तालुक्यातील माडसांगवी (नांदूर) येथील गृहलक्ष्मी महिला औद्योगिक सहकारी संस्था आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या संस्थेने एकूण कारभारात अनियमितता आणि आर्थिक अपहार झाल्याचा गंभीर आरोप जळगाव येथील सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील बन्सी यांनी केला आहे. याप्रकरणी नाशिक विभागाच्या आरोग्य उपसंचालकांकडे त्यांनी लेखी तक्रार व पुरावे दाखल करण्यात आले असून, दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
डॉ. बन्सी यांनी २० फेब्रुवारी रोजी आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांना निवेदन दिले आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल ग्रामीण रुग्णालय आणि इतर ठिकाणी सन २०१४-१५, २०१९-२०, २०२१-२२ आणि २०२२-२३ या आर्थिक वर्षांत झालेल्या रुग्णालयीन साहित्य खरेदी, आहार सेवा पुरवठा व अन्य खरेदी प्रक्रियेत संशयास्पद आर्थिक व्यवहार झाला आहे. गृहलक्ष्मी संस्थेमार्फत करण्यात आलेल्या दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या पुरवठ्याबाबत सोशल मीडियावर काही माहिती व्हायरल झाली होती. या माहितीची दखल घेत डॉ. बन्सी यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे.
डॉ.बन्सी यांनी नमूद केले आहे की, ही संस्था २००८ पासून नाशिक परिमंडळातील रुग्णालयांना सातत्याने पुरवठा करत आहे. विशिष्ट मोडस ऑपरेंडीचा वापर करून शासकीय निधीचा अपहार करत असल्याचा त्यांचा दावा आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या खरेदी प्रक्रियेतील अनेक महत्त्वाचे दस्तऐवज आणि अभिलेख संबंधित रुग्णालयांकडे आता उपलब्ध नसल्याचे समोर येत आहे. हे पुरावे जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आले असावेत, असा संशय डॉ. बन्सी यांनी व्यक्त केला आहे. या तक्रारीच्या प्रती प्रधान सचिव (सार्वजनिक आरोग्य विभाग), लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि जिल्हाधिकारी यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.
यासंदर्भात तत्सिकालीन सिव्हील सर्जन नागोजीराव चव्हाण यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होवू शकला नाही.


