जिल्हाधिकाऱ्यांसह आदिवासी टोकरे कोळी जमातीच्या अभ्यासकांची बैठक संपन्न
जिल्ह्यातील टोकरे कोळी जमातीचे महसूल पुरावे आदिवासी अनुसूचित जमातीच्या दाव्याला पूरक
जळगाव – दि. 4 जानेवारी 2024 पासून शिवतीर्थ मैदान जळगाव येथे आदिवासी टोकरे कोळी जमातीच्या वतीने श्री.पुंडलिक सोनवणे व श्री.प्रभाकर कोळी हे जमाती बांधव अनुसूचित जमातीचा जातीचा दाखला सुलभरीत्या मिळण्याकरिता प्रशासना विरोधात आमरण अन्नत्याग सत्याग्रहाला बसले आहेत.
आज दि. 15 जानेवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे सकाळी 10 वाजता सदर समस्यांबाबत मा.श्री.आयुष प्रसाद, साहेब जिल्हाधिकारी जळगांव यांच्या प्रमुख उपस्थितीत जमातीच्या अभ्यासकांची बैठक पार पडली.सदर बैठकीत टोकरे कोळी अनुसूचित जमातीचे दाखले मिळण्याकरिता सर्व प्रांत स्तरावरून नागरिकांना येणाऱ्या अडचणीविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चे दरम्यान, ब्रिटिश जनगणना अधिकाऱ्यांचे 1901,1911,1921 सालच्या आदेशानुसार मुख्य जातीची नोंद कोळी घेण्याबाबतचा अधिकृत पुरावा सादर करण्यात आला. तसेच महाराष्ट्र राज्य जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 36 अ चा पुरावा घटनेचे कलम 342 अंतर्गत मोडणाऱ्या आदिवासी अनुसूचित टोकरे कोळी जमातीचा सक्षम महसूल पुरावा असल्याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले. जिल्ह्यातील कोळी जमातीला मिळालेल्या कोळी इनाम वर्ग 6 ब अंतर्गत जमिनी हा टोकरे कोळी जमातीचा 1933 सालाचा अस्पृश्य म्हणून गणना केल्याचा पुरावा सादर करण्यात आला. सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून टोकरे कोळी जमातीला सुलभरीत्या अनुसूचित जमातीचे दाखले पारित करण्याचे जिल्ह्यातील सर्व प्रांत अधिकारी यांना निर्देश देण्याचे मा. जिल्हाधिकारी यांनी आदेश केले. बैठकीस जमातीची बाजू मांडणारे अभ्यासक म्हणून श्री.शुभम सोनवणे, ऍड.गणेश सोनवणे, प्रा.भाऊसाहेब सोनवणे, श्री.मदन शिरसाठ, श्री.समाधान पाटील श्री.समाधान सोनवणे, श्री. संजय सपकाळे उपस्थित होते.