धरणगाव नगरपरिषदेतर्फे महास्वच्छता रॅलीचे आयोजन

धरणगाव प्रतिनिधी / विनोद रोकडे
स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० अंतर्गत केंद्र शासनाकडून दि.१ जुलै ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत “सफाई अपनाओ बिमारी भगाओ” अभियान राबविणे बाबत प्राप्त निर्देशानुसार या अभियानामध्ये धरणगाव शहरातील सर्व शाळांनी विविध जनजागृतीपर उपक्रम व प्रात्यक्षिक राबविले. याच अभियान अंतर्गत पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या संकल्पनेनुसार दि. 19 जुलै 2025 रोजी शहरातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांची “महास्वच्छता रॅली” आयोजित करण्यात आली.
महास्वच्छता रॅलीचा शुभारंभ धरणगाव नगरपरिषद कार्यालय येथे “स्वच्छ सर्वेक्षण- सफाई अपनाओ बिमारी भगाओ” असा संदेश असलेला हायड्रोजन बलून लावून मुख्याधिकारी रामनिवास झंवर व पोलीस निरिक्षक सुनिल पवार यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला. सदर रॅली छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून निघून परिहार चौक, नेताजी रोड, महावीर चौक, मेन रोड बाजारपेठ, तेली तलाव, सोनवद रोड मार्गे आठवडे बाजार मैदानात आली. या रॅली दरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी स्वच्छता तसेच प्लास्टिक बंदी व अभियाना विषयी घोषणा देत नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला. या महास्वच्छता रॅलीत शहरातील बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा, सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालय, इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय, पी आर हायस्कूल, आदर्श प्राथमिक शाळा, ॲग्लो उर्दू हायस्कूल, जिल्हा परिषद उर्दू शाळा क्र. 2, महात्मा फुले हायस्कूल अशा सर्व शाळांचे सुमारे 5000 विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांसह सहभागी झाले होते.
आठवडे बाजार येथील मैदानात प्रा. व्ही. जी. पाटील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे साकार केलेला “सफाई अपनाओ, बीमारी भगाओ” हा संदेश व बालकवी ठोंबरे शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्लॅस्टीक बंदी व स्वच्छतेबाबत सादर केलेला सजीव देखावा हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. त्यानंतर अभियानाच्या उद्देशावर आधारीत कचरा व्यवस्थापन विषयावर इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय, हात धूणे बाबत जनजागृती यावर सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालय व बालकवी ठोंबरे प्राथमिक विद्यालय, प्लास्टीक बंदी या विषयावर पी आर हायस्कूल, सफाई अपनाओ, बीमारी भगाओ या विषयावर आदर्श विद्यामंदीर तसेच धूम्रपान व सार्वजनिक ठिकाणी थुंकणे बाबत महात्मा फुले हायस्कूल यांनी एका हून एक सुंदर अशी पथनाट्ये सादर केली.
त्यानंतर या अभियान अंतर्गत दि. 01 जुलै ते 18 जुलै दरम्यान शालेय स्तरावर स्वच्छता विषयावर आधारित रांगोळी, चित्रकला, रंगभरण, निबंध, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविणे तसेच प्लास्टिक संकलन मोहिम स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्याना शाळानिहाय प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच या अभियानामध्ये सक्रिय सहभाग नोंदविणा-या शाळांच्या मुख्याध्यापकांचा देखील सन्मानपत्र व वृक्षरोप देवून पोलीस निरिक्षक सुनिल पवार व मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यानंतर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांसह स्वच्छतेची शपथ घेवून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
आठवडे बाजार मैदान येथील आयोजित कार्यक्रमात प्रास्ताविक मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी केले. त्यावेळी शहरातील नागरींकांनी सहकार्य केल्यास शहर स्वच्छ होण्यास मदत होईल व त्याचे मुख्य माध्यम शाळेचे सर्व विद्यार्थी असतील तसेच विद्यार्थ्यांचा सहभाग “धरणगाव शहर बदल रहा है“ हे दर्शवित आहे असे त्यांनी प्रास्ताविकात नमुद केले. यावेळी पोलीस निरिक्षक सुनिल पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक , शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच धरणगाव नगरपरिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी वृंद उपस्थित होते. सदर कार्यक्रमात सहभागी झालेल्या 5000 विद्यार्थ्यांना खाऊ तसेच “स्वच्छ धरणगाव, सुंदर धरणगाव” असे नाव प्रिंट असलेले पेन वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन किरण चव्हाण सर व परमेश्वर रोकडे सर यांनी केले तर किरण पाटील सर यांनी आभार मानले.
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याधिकारी रामनिवास झंवर, यांच्या मार्गदर्शनाखाली भिकन पारधी कार्यालय अधिक्षक,आरोग्य निरीक्षक हैबतराव पाटील व संतोष बिऱ्हाडे,धनंजय कोठूळे पाणी पुरवठा अभियंता, राहूल तळेले विद्युत अभियंता, शिवाजी चव्हाण लेखा अधिकारी,शेख शमशोद्दीन, रामकृष्ण महाजन, आण्णा महाजन, सिकंदर पवार, निलेश वाणी, महेश चौधरी, मुझंमिल शेख यांचे सह सर्व नगरपरिषद व सफाई कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.