धरणगाव शहर

धरणगाव बस स्थानकासमोरील अतिक्रमित दुकानदारांना नगरपालिकेने दिल्या ‘नोटिस’ ; सात दिवसात दुकान खाली करा

धरणगाव – येथील बस स्थानकासमोरील नगरपालिका हद्दीतील अतिक्रमित दुकानदारांना नगरपालिकेच मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी नोटिसेस दिल्या असून सात दिवसाच्या आत अतिक्रमित बांधकाम स्वखर्चाने पडण्याचे नोटिसीत म्हटले आहे.

नोटिसीत म्हटल्यानुसार धरणगाव नगरपरिषद हद्दीतील जुन्या सि. स. क्रमांक ५२९३ आणि ५२९४ या जागेवर क्रीडांगण आरक्षित असून सदर जागेवर क्रीडांगण व शॉपिंग कॉम्प्लेक्स विकसित करण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. सदर जागेवर अतिक्रमित बांधकाम आहे. मी, नियोजन प्राधिकरण या नात्याने महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५२, ५३ तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक अधिनियम १९६५ कलम १८०, १८१ नुसार या क्रीडांगणासाठी आरक्षित केलेल्या जागेवर अतिक्रमित / अनधिकृत बांधकाम तातडीने सात दिवसाच्या आत स्वखर्चाने निष्कासित करण्यात यावे. अन्यथा सदर बांधकाम नगरपरिषदे मार्फत निष्कासित करण्याची कार्यवाही करण्यात येईल व झालेला खर्च आपणाकडून वसूल करण्यात येईल. अशी नोटिस सर्व दुकानदारांना देण्यात आली आहे.

नोटिस प्राप्त झाल्यानंतर या दुकानदारांनी आपल्या व्यथा व्यक्त केल्या असून गेल्या कित्येक वर्षांपासुन आम्ही या ठिकाणी व्यवसाय करीत असून आमचा पोटा पाण्याचा प्रश्न भागवीत आहेत. या ठिकाणी कॉम्प्लेक्स झाले तरी आम्ही कॉम्प्लेक्स मध्ये दुकान घेवू अशी परिस्थिती आमची नाही. आता आम्ही कुठे जावे असा प्रश्न दुकानदारांनी उपस्थित केला आहे.

नोटिस मिळताच सर्व दुकानदारांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेवून आपली कैफियत मांडल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तसेच यासंदर्भात मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून त्याठिकाणी असलेले अतिक्रमण सद्ध्या पावसाळ्याचे असून तूर्तास तरी दुकानदारांवर कार्यवाही होणार नसल्याचे म्हटले आहे. मात्र तरी त्यांनी कार्यवाही साठी तयारीत राहावे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *