प्राचार्य डॉ.चंद्रसेन कोठावळे समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

पाचोड (प्रतिनिधि) दि. 18 : धुळे येथे आयोजित केलेल्या श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्था आणि इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फौंडेशनतर्फे दिला जाणारा राष्ट्रीय सन्मानाचा समाजरत्न पुरस्कार 2025 पाचोड येथील शिवछत्रपती कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांना धुळे येथील श्री शिवाजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील सभागृहामध्ये मानचिन्ह व मानपत्र देऊन सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
श्री शिवाजी विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डाॅ. संजय पाटील, उपाध्यक्ष डॉ. प्रफुल्लकुमार सिसोदे, रियल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फौंडेशनचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मनोहर पाटील, सचिव प्रा. डॉ. संभाजी पाटील, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रमोद पवार, सहसचिव डाॅ. मोहन पवार, प्राचार्य डॉ. पी. डी. देवरे, डाॅ. दिलीप पाटील यांच्या शुभहस्ते डाॅ. चंद्रसेन कोठावळे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
मत्स्योदरी शिक्षण संस्थेत प्रदीर्घ सदतीस वर्षे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून उत्तम सेवा बजावलेले डाॅ. चंद्रसेन कोठावळे हे मागील तीन वर्षांपासून पाचोड येथील शिवछत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून यशस्वीपणे कार्य करत आहेत. मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. खा. अंकुशराव टोपे व मा. पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते डाॅ. चंद्रसेन कोठावळे यांना मत्स्योदरी सेवा गौरव पुरस्कारही प्रदान करण्यात आलेला आहे. गत चाळीस वर्षाच्या सेवेच्या काळात उत्तम अध्यापन, विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास, करिअर मार्गदर्शन, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, जलसंवर्धन, मतदान जनजागृती अभियान इ. उपक्रम राबवून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा कुणबी आरक्षणाच्या समर्थनार्थ महाराष्ट्र न्यूज चॅनलवर महाचर्चेमध्ये सातत्याने अभ्यासपूर्ण भुमिका मांडलेली आहे.
प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांना यापूर्वी मुंबई येथील मनुष्यबळ लोकविकास अकॅडमीतर्फे उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार, अहमदाबाद येथील ग्लोबल मॅनेजमेंट कौन्सिलचा राष्ट्रीय आदर्श प्राचार्य पुरस्कार,
उच्च व तंत्रशिक्षण विभाग (म.रा.)आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र (कोल्हापूर) यांचे तर्फे दोन वेळा राज्यस्तरीय (पन्नास हजाररू. रोख पारितोषिक) उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार, लोकमत मिडीया समुहातर्फे ग्लोबल एज्युकेशनल एक्सलन्स अवॉर्ड 2024, संभाजीनगर येथील सामाजिक व सांस्कृतिक पुनरूत्थान महासंघामार्फत स्नेहलता मारूतीराव पाटील जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री ज्ञानेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्थेचे सचिव तथा संभाजीनगरचे खा. संदीपान पाटील भुमरे, पैठणचे आमदार विलास बापू भुमरे, सचिव राजूनाना पाटील भुमरे, पाचोडचे सरपंच शिवराज पाटील भुमरे यांनी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डाॅ. कोठावळे यांचे अभिनंदन केले आहे. उपप्राचार्य डाॅ. शिवाजी यादव, डाॅ. सुरेश नलावडे, श्री. सतीश वाघ, डाॅ. संतोष चव्हाण, डाॅ. गांधी बानायत, डाॅ. हरिप्रसाद बिडवे, डाॅ. सुभाष पोटभरे, डाॅ. विलास महाजन आदी प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी वर्तुळातूनही प्राचार्य डाॅ. चंद्रसेन कोठावळे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.